नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
शासन निर्णय क्र.बीसीएच/प्र.क्र.२९३/शिक्षण-२, दि.26 डिसेंबर 2024 च्या निर्णयान्वये राज्यात दिवसेंदिवस वाढत आसलेली व्यावसायीक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत आसलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतीगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही व वसतीगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. त्यामुळे तालुकास्तरावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
या योजनेसाठी सन 2024-25 या वर्षासाठी अर्ज करण्यासाठी पात्र विध्यार्थ्यास करण्यासाठी 15 जानेवारी 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील निकषाप्रमाणे अर्ज करावयाचे आहेत.
लाभाचे स्वरूप:- या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम भोजन भत्ता 23 हजार, निवास भत्ता 10 हजार, निर्वाह भत्ता 5 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम दोन सत्र 10 महिन्यासाठी 38 हजार रुपये राहील. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. (वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल)
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष/सूचना:-
विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी विध्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे . परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करतांना संबंधीत विद्यार्थ्यांने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमुद करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयुल्ड बँकेत खाते उघडले आहे. त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्रशासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षीक उत्पन्न मर्यादा त्या त्या प्रमाणे लागु राहील. साधारणत: दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. तसेच ते कार्यान्वयीत नसल्यास गृहपाल/ सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुभा राहील. अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहिल. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशीरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिण्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल.
विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृहात मिळालेला प्रवेश रद्य करुन म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करुन स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमत: वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तदनंतर गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ अनुद्येय राहील.
सदर योजनेसाठी अनु.जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.
शैक्षणिक निकष:-
सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी,१२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपालीका/ग्रामपंचायत /कटक मंडळे यांच्या हद्यीत आहेत त्या महानगरपालीकानगरपालीका/ग्रामपंचायत /कटक मंडळे/ तालुक्यातील रहीवासी नसावा. तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. विद्यार्थ्यास इयत्ता १०वी/११ वी,१२वी/पदवी/पदविकामध्ये किमान ५०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. एका शाखेची पदवी किंवा पदवित्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेचे पदवी किंवा पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुद्येय राहनार नाही. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०टक्के असेल. वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेतील नियमावलीनुसार मध्यंतरीच्या वर्गात प्रवेश देता येत नाही. तथापी, विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासुन केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरीता लाभ देता येईल. स्वाधार योजनेसाठी महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा ०२ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहील.तथापी, शिक्षणातील खंड हा 2 वर्षापेक्षा जास्त असु नये. व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त 8 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. याकरीता विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील. तसेच या प्रणाली मध्ये आपल्या महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. च्या आत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे सदर योजनेच्या लाभाची रक्कम ही आधार संलग्न बँक खात्यात पडणार असल्याने सर्व विध्यार्थ्यानी आधार लिंक करून KYC करून घ्यावी. व अर्ज भरत असताना आधार क्रमांक अचूक आहे याची खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांचा नूतनीकरणाचा अर्ज आहे त्यांनी EXISTING या TAB वरून अर्ज भरावा (वस्तीगृहास अर्ज करू नये ) तसेच जे विध्यार्थी नवीन आहेत त्यांनी थेट स्वाधार ला अर्ज करावा. तसेच ज्या विध्यार्थीनी यापूर्वी ऑनलाईन प्रणाली मार्फत वस्तीगुहासाठी अर्ज केला आहे.त्यांचे अर्ज स्वाधार साठी आपोआप वर्ग होतील त्यांना वेगळ्याने स्वाधार साठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील.तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. तेंव्हा पात्र विध्यार्थ्यानी http://hmas.mahait.orgया संकेतस्थळावर वरील निकषानुसार 15 जानेवारी 2025 या कालवधीत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची 1 प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या भागतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाकरिता मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्या कडे जमा करणे बंधनकारक आहे.