✍️ *महेश लांडगे*
पोलीस निरीक्षक, परभणी
मो.नं. – 9822417500
*पुस्तकाचे नाव :- माय तुहे किती आठव आठवू*
*लेखक :- सर्जेराव जिगे*
*प्रकाशन :- आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजी नगर*
*स्वागत मूल्य :- ₹ २००/-*
*पृष्ठे :- १२०*
*”माय तुहे किती आठव आठवू”*
खरंतर “माय” किंवा “आई” हा जगातील सर्वात प्रिय शब्द. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना वारंवार हवीहवीशी वाटणारी व्यक्ती म्हणजे आई. आत्मरूपी ईश्वर म्हणजे आई. मनुष्य प्राणी जन्माला आल्यानंतर ज्याला प्रथम भेटतो ती म्हणजे आई. आई याविषयी अनेक कवींनी आपल्या भावना यापूर्वी देखील मांडलेल्या आपण वाचल्या आहेत. आई विषयी सर्वांचीच भावना उत्कट असते.
कवी श्री.फ.मु.शिंदे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
“आई एक नाव असतं,
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं”
“आई असते सात जन्माचे शिदोरी,
सरतही नाही आणि उरतही नाही”
आई विषयी अशा प्रकारे अनेक कवी व कवयित्री यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत व ते आपण वाचल्या देखील आहेत. परंतु कवी सर्जेराव जिगे यांनी माय तुहे किती आठव आठवू या कवितासंग्रहात अभंग रुपी आईचे चरित्र व तिच्या आयुष्याचा लेखाजोखा सादर केला आहे. कवितासंग्रहाचे नाव पाहता क्षणीच आपल्याला या काव्यसंग्रहात आई विषयीच कविता असणार याची जाणीव होते. काव्यसंग्रहाचा मुखपृष्ठ मुखपृष्ठावरील स्त्रीचे चित्र पाहता क्षणी ती जुन्या आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत असल्याचे जाणवते. ललाटी कपाळभर कुंकू, नाकात नथ आणि डोईवर पदर व सोबतीला डोळ्यावरील चष्मा हे जुन्या आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व दाखवून देते. मलपृष्ठावर प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे व अनुराधा पाटील यांनी कवितासंग्रहाबद्दल आपले दोन शब्द व्यक्त केले आहेत.
कवी सर्जेराव जिगे यांची आई म्हणजेच अक्का जी शेती मातीलाच विठ्ठल मानून अविश्रांतपणे काळ्या आईची सेवा करते व तिच्यासम सर्वच कष्टकरी मायमाऊलींना हा काव्यसंग्रह समर्पित केला आहे.
प्रस्तावनेपूर्वी मांडणी केलेल्या अक्का या कवितेत कवी म्हणतो,
“अक्का मही माय | सोबत शिदोरी |
अनंताची वारी | माय मही ||”
काव्यसंग्रहास डॉ. वासुदेव मुलाटे यांची अतिशय सविस्तर अशी प्रस्तावना लाभलेली आहे. काव्यसंग्रहातील रचना ह्या पूर्णतः अभंग रचना आहेत. ज्यामध्ये एकूण ५७ भाग असून ५१३ अभंग रचना आहेत. ह्या अभंग रचना वाचत असताना एक गोष्ट जाणवते की, अभंगातील चरणाच्या शेवट होणाऱ्या शब्दाला गुंफून नव्या अभंगाची सुरुवात होते. अशा पद्धतीने रचना करणे हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कवीने ही लय शेवटपर्यंत सांभाळली आहे. वाचकाला प्रत्येक रचना वाचत असताना वरील गोष्टीची अनुभूती शेवटपर्यंत मिळत राहते, हे कवीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
“काय मागू देवा | तू तर भिकारी |
माय ही शिदोरी | जीवनाची ||”
“जीवनात माय | जगण्याचा श्वास |
पिलांना विश्वास | देई माय ||”
अशा पद्धतीने अभंगाची मांडणी केलेली दिसून येते जी हळुवारपणे एका अभंगातून दुसऱ्या अभंगात गुंतलेली दिसते. वाचक हळुवारपणे एका कडव्यातून दुसऱ्या कडव्यात आपोआप गुंतून जातो व लयबद्ध वाचनाची ओढ निर्माण होते.
कवी आपल्या आईची कहाणी सुरुवातीलाच सांगताना म्हणतो,
“काय सांगू तुम्हा | मायीची कहाणी |
डोळ्यातलं पाणी | आटलेलं ||”
यावरून आपल्याला सहजच लक्ष येतं की कवीच्या आईची कहाणी ही खूप संघर्षमय कहाणी आहे. पहिल्याच कवितेत कवी आईचे वर्णन करतो व त्यात म्हणतो की,
“हातभर चुडा | पायात जोडवे |
मुखात गोडवे | अंबे तुहे ||”
माय हिच्यावर विठ्ठलाचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. किंबहुना माही माय ही वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवते असे दिसून येते. माय वारीला गेली किंवा नाही हे सांगता येत नाही परंतु तिच्या मुखामध्ये अखंड विठ्ठल असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी विठ्ठल आपल्याला वाचताना भेटतो. त्यामुळेच कवी म्हणतो,
“विठ्ठलची माय | विठ्ठलची बाप |
निवारी तो शाप | विठ्ठलची ||”
सुख आणि दुःख या दोन्ही क्षणी माय ही पांडुरंगाला साद घालीत राहते. म्हणून कवी म्हणतो,
” विठ्या तुही कृपा | पावसाचं दान |
उगवलं सोनं | काळ्या रानी ||”
” निर्ढावला विठ्या | कर कटेवरी |
कुणब्याच्या घरी | शोककळा ||”
माय ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सुकाळ, दुष्काळ असं सारं सारं काही ती अनुभवते.
“शिवारी जागल्या | दुष्काळाच्या खुणा |
कुणब्याच्या मना | भेगा पडे ||”
आपल्या सर्वांचीच आई ही नेहमी आधी आपल्या पिलांना चारा भरवते, मग उरले तर ती खाते. वेळप्रसंगी ती उपाशी राहते म्हणूनच कवी म्हणतो की,
“मुखातला घास | भरून पिलाशी |
राहते उपाशी | माय जगी ||”
माय तिचा संसार करताना काटकसर करून कुटुंबाला पुढे नेण्यासाठी संघर्ष करत राहते व तो संघर्ष करताना तिला अतोनात दुःख झालं तरीही तिचं दुःख लपवून चेहऱ्यावर हसू ठेवते.
” दांडाचं लुगडं | चोळीलाही गाठी |
सुखाचिया गोठी | मुखी तिच्या ||”
” लपवून दुःख | माय सदा हसे |
समाधानी असे | संसारात ||”
माणुसकी आणि देवपणा या दोन्ही गोष्टी सेवेतून साधल्या जातात हा मायीचा कर्मभाव सांगताना कवी म्हणतो,
” माणसात देव | शोधितसे माय |
म्हणे तीर्थी जाय | अकारण ||”
” जानियेले तिने | पाप- पुण्य – कर्म |
सेवाहाची धर्म | आचरिला ||”
मायीला असलेला सासुरवास या ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होतो. जुन्या आणि नव्या पिढीत सुद्धा सासरवास हा कायम असल्याचे दिसून येते. घरोघरी आज मातीच्या चुली नसल्या तरी मानवी वृत्तीमध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यामुळेच सुनेला असणारा सासरकडील त्रास, तिचा होणारा छळ याबाबी आजही कमी जास्त प्रमाणात आपल्याला समाजामध्ये वारंवार दिसून येतात. म्हणूनच कवी म्हणतो की,
” आळवले तिने | आयुष्याचे बोल |
अंतरीची सल | रुतलेली ||”
” बानं तिचं कधी | नाहीच ऐकलं |
मन जानियले | उभा जन्म ||”
” बाप माझा तसा | तापट कडक |
मायीची धडक | पाषाणाला ||”
कवी मायची महती सांगताना चक्क देवालाच एका ठिकाणी म्हणतो की,
“काय मागू देवा | तू तर भिकारी |
माय ही शिदोरी | जीवनाची ||”
आईने दिलेल्या आशीर्वाद आणि संस्काराच्या शिदोरी पुढे देवाचे दान देखील भिकाऱ्यासारखे आहे, हे थक्क करणारे आहे.
अशा अनेक अभंगाच्या रचना आपल्याला या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. प्रत्येकाच्या मायची अशीच थोडीफार फरक असणारी कहाणी असते. जुन्या पिढीतील मायीची कहाणी तर अशीच असणार यात शंकाच नाही. असे असतानाही माय मात्र तिच्या संस्कार आणि जबाबदारी कधीही टाळताना किंवा त्यापासून दूर पडताना दिसून येत नाही तर ती अधिक खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या संकटांचा सामना करते. म्हणूनच कवी म्हणतो,
” उभा जन्म तिनं | सोशियल्या कळा |
मनात उमाळा | दाबूनिया ||”
मानवाला जन्म आणि मृत्यू चा असलेला फेरा हा अटळ आहे. आणि हा फेरा पूर्ण होताना कवी चा स्वर अधिक आर्त होतो,
“जीवन मरण | नियतीचा खेळ |
भावनेचा मेळ | संसारात ||
तरीही संसार | गेला शेवटाला |
काला गोड झाला | पंढरीत ||”
एकंदरीत अभंग रुपी काव्यरचना वाचताना अक्का सोबत पांडुरंग देखील आपल्यासमोर उभा राहतो. कवीच्या अभंग रुपी कविता वाचत असताना वाचकाला सुद्धा त्याची आई किंवा माय नेहमी आठवत राहते व त्यातून त्याच्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओल्या होतात. अभंगाची रचना अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात केली आहे. वाचल्यानंतर त्याचा अर्थ सहजपणे उमगतो. त्यामध्ये कोठेही अतिशयोक्ती असल्याचे जाणवत नाही. अक्का ही कवीची माय असली तरी ती सर्व वाचकांच्या आईचे प्रतिनिधित्व करते. थोडाफार फरक सोडला तर सर्वत्र आपल्या आईच्या बाबतीत हीच परिस्थिती वाचकाला विचार करण्याला प्रवृत्त करते, हेच या काव्यसंग्रहाचे यश आहे असे मला वाटते.