नांदेड(प्रतिनिधी)-बनावट क्रमांक वापरून अस्तित्वात असलेला एक 17 लाख रुपयांचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला आहे. याबद्दल दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धम्मपाल ग्यानोबा कांबळे या पोलीस अंमलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जानेवारी रोजी रात्री त्यांना बोंढार वळण रस्त्यावर एक बनावट क्रमांकाचा ट्र्रक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या ट्रकची विचारपुस केली. त्या 14 टायर असलेल्या ट्रकवर सी.जी.23 के.7790 असा क्रमांक लिहिलेला होता. पडताळणी केली असता मुळात त्या ट्रकचा क्रमांक एम.एच.40 बी.एल.5993 असा आहे. कागदपत्रांची विचारपुस केली असता कागदपत्रे नव्हती. ट्रकचा क्रमांक बदलून हे आरोपी शासनाची, पोलीसांची, विमा आणि फायनान्स कंपनीची दिशाभुल करून फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. या ट्रकची किंमत 17 लाख रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरुन अमरजितसिंघ दलबिरसिंघ बुटर (37) रा.दशमेशनगर बाफना आणि अमृतपालसिंघ सिधु हा फरार झालेला आरोपी या दोघांविरुध्द भारतीय न्याय संहितेतील कलम 318(2), 336, 339, 340 नुसार गुन्हा क्रमांक 18/2025 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक विश्र्वजित रोडे, पोलीस अंमलदार सुनिल गटलेवार, जमीर, धम्मपाल कांबळे आदींनी ही कार्यवाही केली.