नांदेड(प्रतिनिधी)-सन 2006 मध्ये नांदेड शहरात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 19 वर्षानंतर आज जाहीर झाला. या खटल्यातील 7 आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी मुक्त केले आहे.
दि.6 एप्रिल 2006 रोजी नांदेड शहरातील पाटबंधारेनगर भागात रात्री बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट बऱ्याच लोकांनी ऐकला. पण काही तरी फटाके उडविले जात असतील या कारणावरुन लोकांनी अगोदर दुर्लक्ष केले. पण ज्या घरात हा बॉम्बस्फोट झाला होता. त्या नरेश राजकोंडावार यांच्या घरातून धावपळ सुरू झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे लक्ष या घटनेकडे गेले. पण पोलीस आल्यानंतर या प्रकरणाला जास्त वाव मिळाला. त्या ठिकाणी बरेच साहित्य बॉम्बस्फोटच्या धक्याने आस्थावस्थ झाले होते आणि हिमांशु पानसे आणि नरेश राजकोंडावार असे दोघे मरण पावलेले होते. त्यानंतर जखमी अवस्थेतील मारोती वाघ, योगेश देशपांडे यांना दवाखान्यात नेण्यात आले. सुरूवातीला डॉक्टरांनी माणुसकीच्या भावनेतून उपचार केले. परंतू त्यांनी पोलीसांना माहिती दिली नाही असाही आरोप त्यावेळी डॉक्टरांवर झाला. त्यांना आरोपी करण्यात आले होते. पुढे या खटल्याची सुनावणी सुरू असतांना राहुल पांडे या आरोपीचा सुध्दा मृत्यू झाला होता. अत्यंत गाजलेले हे प्रकरण पुढे हिंदु आतकंवाद या नावाने सुध्दा बोलले जाऊ लागले. घटनेच्या तिसऱ्या दिवशी तपासणीच्या वेळेस त्याच घरात एक जीवंत बॉम्ब सापडला होता. त्यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचालक डॉ.परविंदरसिंघ पसरिचा हे होते आणि नांदेडचे पोलीस अधिक्षक फत्तेसिंह पाटील हे होते. याप्रकरणाची तक्रार रविंद्र देहडकर यांनी दिली होती. या प्रकरणाला असंख्य पोलीस निरिक्षकांनी हाताळले होते. त्यात रमेश भुरेवार, अनिल तमयचेकर, श्रीकांत महाजन, विजय पन्हाळे, प्रविण मोरे आदींचा समावेश होता.
या खटल्यात पोलीसांनी सुरूवातीच्या काळात 23 जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींची ब्रेन मॅपींग करण्यात आली. लाईव्ही डिटेक्शन व नारकोटीक टेस्ट झाली. त्या ठिकाणी धातुचे तुकडे सापडले होते. असाच अहवाल वैध वैज्ञानिक प्रयोग शाळेने दिला होता. या संदर्भाचा 2006 च्या आमच्या बातम्यातील ठळक मुद्दे असे आहेत की, या लोकांनी बॉम्ब तयार करणे शिकले होते. त्यांचा संबंध जालना, परभणी, पुर्णा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी जोडला गेला होता. त्यावेळी असे सांगितले जात होते की, बॉम्ब तयार करून ते टी.व्ही. जवळ ठेवले होते आणि टी.व्ही. रिमोट कंट्रोलद्वारे सुरू करण्याची प्रक्रिया करत असतांना त्या रिमोट कंट्रोलने बॉम्बशी संपर्क साधला आणि बॉम्बस्फोट झाला होता. पण असा प्रकार पुढे न्यायालयाच्या प्रक्रियेत कुठेच आला नाही. एकूण 23 आरोपींना अटक केली असतांना त्या तपसाची प्रगती शेवटी अशी राहिली की, यातील आरोपी संजय चौधरी, रामदास मुळंगे, मारोती वाघ, योगेश रविंद्र देशपांडे, गुरराज तुपतेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. इतर अटक केलेल्या आरोपींची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 169 प्रमाणे दोषमुक्ती झाली होती.
या खटल्यात एकूण 49 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. त्यात बहुतांश पोलीस आहेत. अनेक डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी राधेशाम मोपलवार यांची सुध्दा साक्ष झाली होती. तसेच पोलीस निरिक्षक श्रीकांत महाजन, रमेश भुरेवार, विरद्रर सुरवसे, विजय पन्हाळे, प्रविण मोरे यांच्याही साक्ष झाल्या. हे दोषारोपपत्र सीबीआयने दाखल केले होते. सीबीआयच्यावतीने ऍड. रमन त्यागी यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. आरोपींच्यावतीने ऍड. आर.जी. परळकर, ऍड. नितीन रुणवाल, ऍड.चंद्रकांत पत्की, ऍड. आर.सी. बाहेती, ॲड. गोत्तम किणीकर यांनी आरोपींच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणात बॉम्बस्फोट झाले होते. हा घटनाक्रम सरकार पक्षाला सिद्द करता आला नाही आणि म्हणूनच या प्रकरणात आज एकूण 8 आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायालयाने खटल्याच्या आरोपातून मुक्त केले आहे.