मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन
मुंबई- 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.. या घटनेला आता 193 वर्षे पूर्ण झाली आहेत..6 जानेवारीला दर्पण सुरू झाले.. या दिनाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.. अनेकांचा समज असा आहे की, 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आहे म्हणून तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.. हे चुकीचं आहे.. बाळशास्त्रीं जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला आहे.. मृत्यू 17 मे 1846 रोजी झाला आहे.. तीन वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्यातील महनिय व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे.. त्यावेळेस अनेक कागदपत्रे धुंडाळून आणि इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून महाराष्ट्र सरकारने 20 फेब्रुवारी 1812 रोजी आचार्य बाळशास्त्री यांचा जन्म झाल्याचे जाहीर केले.. तसा जीआर देखील काढला गेला.. राज्यातील शासकीय कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती साजरी केली जाते…या संदर्भात गुगलवरील चुकीच्या माहितीचा अनेकजण आधार घेतात.. गुगलवर 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींचा जन्म झाल्याचे म्हटले आहे, ते धादांत चुकीचे आहे.. फोटोच्या संदर्भातही असाच संभ्रम आहे.. गुगलवर बाळशास्त्रींचे चार वेगवेगळे फोटो आहेत.. मात्र यापैकी केवळ सोबत दिलेला फोटो हाच योग्य वाटतो.. कारण बाळशास्त्रींचे निधन वयाच्या 34 व्या वर्षी झाले.. म्हणजे ते तरूणपणी गेले.. प्रकांड पंडित, भाषा प्रभू असलेल्या बाळशास्त्रींच्या चेहऱ्यावर त्यांच्या विद्वत्तेचे तेज विलसत होते.. शिवाय ते नियमित व्यायाम करायचे त्यामुळे शरीरयष्टी बऱ्यापैकी चांगली होती.. बरं ते फार काळ आजारी होते असंही नाही.. किरकोळ ताप आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.. परंतू जे फोटो गुगलवर दिसतात त्यात बाळशास्त्री 70 वर्षांचे, खंगलेले दिसतात.. असं नाही.. मराठी पत्रकार परिषदेनं या सर्व गोष्टींचा विचार करून मुकुंद बहुलेकर या चित्रकाराकडून हे छायाचित्र बनवून घेतले.. 1999 मध्ये या चित्राचे अनावरण पुण्यातील बालगंधर्व मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी हेच खरे बाळशास्त्री असे सांगत चित्रकार बहुलेकर यांचा सत्कारही केला होता.. ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन पत्रकार दिन साजरा करताना दोन पथ्ये पाळावीत.. 6 जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन नाही हे लक्षात असू द्यावे आणि कार्यक्रमात सोबत दिलेला फोटो वापरावा..चुकीचा फोटो आणि चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पत्रसृष्टीला केले आहे.