दहा डिसेंबरला जागतिक मानवाधिकार दिन होता. या दिवशी दलित शोषित उपेक्षित समाज घटक आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित असतात. माणूस म्हणून मिळवायच्या आपल्या हक्क व अधिकाराची ते आठवण करुन देत असतात. यावर्षी जरा उलटेच घडले, म्हणजे घडऊन आणले असावे !
बांगला देशातील हिंदूंवर अन्याय होत आहेत म्हणून सनातनी संघीय संघटनांनी आक्रोश मोर्चे काढले. त्यांनी एक पुडी सोडली की मानवाधिकार फक्त अल्पसंख्यांक दलित व मुस्लीम समाजासाठीच आहे काय ? बांगला देशात हिंदूंवर अन्याय होत आहेत, त्यांच्यासाठी मानवाधिकार नाही काय ? (यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोम्बा !) म्हणून जागतिक मानवाधिकार दिनी म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदूंचे आक्रोश मोर्चे काढण्यात आले. (आता हिंदू म्हणजे नेमके कोणत्या जातीचे लोक हे त्यांनी स्पष्ट केले नाही ! बांगला देशात नेमक्या कोणत्या जातीच्या हिंदूंवर अन्याय अत्त्याचार झाले, ते देखिल गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे !)
राज्यात यांची सत्ता, देशातही यांचीच सत्ता असतांना यांना मोर्चा काढून सरकारला निवेदने देण्याची आवश्यकता का भासली ? भारताचे राष्ट्रपती हिंदू, प्रधानमंत्री हिंदू, गृहमंत्री हिंदू, संरक्षण मंत्री हिंदू ! सारे मंत्रीमंडळ हिंदूंचेच, त्यात बियाला एकही मुसलमान नाही, एक दोन उष्टे दलित असतील पण ते ही स्वतःला हिंदूच समजतात ! हे एवढे सारे हिंदू केंद्राच्या सत्तेवर असतांना त्यांना बांगला देशातील हिंदूंवरील अन्याय दिसले नाहित काय ? त्यासाठी आक्रोश मोर्चे काढण्याची आवश्यकता का भासली ? सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चे काढायचे नसतात तर डायरेक्ट प्रश्न सोडवायचे असतात ! मग यांनी मोर्चे का काढले ? तर यांना कुठल्याच हिंदूंचे कांहीही देणे घेणे नाही ! यांना फक्त देशातील माहौल खराब करायचा आहे. वन नेशन, वन ईलेक्शन सारखे कायदे (भावी हुकूमशाही ?) संमत करुन घेण्यासाठी देशातील जनतेला कथित हिंदुत्वाची भूल द्यायची होती !
म्हणून तर आक्रोश मोर्चातील घोषणा होत्या, “बटेंगे तो कटेंगे !”, “एक है तो सेफ है !” याच घोषणा प्रधान मंत्र्यांनी निवडणूक प्रचार सभेत दिल्या होत्या ! यावरुन आक्रोश मोर्चाचे मास्टर माईंड कोण आहे ते लक्षात येते. हा कट नागपूरच्या रेशीम बागेत शिजला हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज भासता कामा नये !
मोर्चात आणखी कांही गमतीदार घोषणा देण्यात आल्या. “संकटात हिंदू तर मदतीला लाखो बंधू !” परभणीत पोलीस अत्याचारात मरण पावलेला सोमनाथ सुर्यवंशी हा हिंदूच आहे. वडार ही जात हिंदूतच मोडते. त्याच्यासाठी आक्रोश मोर्चा काढणारे कुणीही धाऊन आले नाहित. वडार संकटात आहे तर तो तुमचा बंधू असत नाही काय ?
आक्रोश मोर्चात आणखी एक घोषणा होती, “जात पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई भाई !” अरे मग विसरुन जा की सोमनाथ वडार जातीचा आहे. विसरुन जा त्याची वडार जात. करा बिदाई त्याच्या वडार जातीची. तो आपला हिंदू भाई आहे म्हणून तरी अरे दुष्टांनो, त्याच्या अंत्ययात्रेत तरी तुम्ही सहभागी झालात काय रे ?
दहा डिसेंबरचा परभणीचा आक्रोश मोर्चाच कळीचा मुद्दा ठरला. मोर्चा संपल्यावर लगेच या मोर्चातील एकाने (सोपान पवार) रेल्वे स्टेशन समोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली ! या दिशेने पोलीस तपासाची चक्रे फिरायला हवी होती पण तसे झाले नाही देवा भाऊ ! आपण तर जाहिर करुन टाकले की, सोपान पवार माथेफिरु आहे, मनोरुग्ण आहे. संविधानाचा अपमान करणारे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे हे सारे मनोरुग्णच कसे काय निघतात ? हे मनोरुग्ण फक्त संविधानाची व बाबासाहेबांचीच विटंबना कशी काय करतात व हे मनोरुग्ण आहेत याबाबत कोणत्या डाॅक्टरने व कोणत्या मनोरुग्णालयाने अहवाल दिला ? कधीपासून सदर मनोरुग्ण हा मनोरुग्ण आहे, त्याने यापूर्वी कधी असे गैरकृत्य केले काय ? याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. देवा भाऊ, आपण वाचाळ आहात पण उचलली जीभ लावली टाळ्याला असे वागू नका.
सोपान पवार माथेफिरु आहे, त्याच्या नादाला लागू नका, त्याचे मनावर घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ते असेच बोलणार ! कारण त्यांना कदाचित आरोपीला वाचवायचे असेल किंवा त्यांनी हे प्रकरण हलक्यावर घेतले असावे. कारण यांनी अशीच अक्कलहुशारी करुन जातीचे नगण्य संख्याबळ असतांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविले आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पिडितेच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यास ते मुद्दाम वेळातील वेळ काढून उपस्थित राहिले, याची मनोज जरांगे यांना खबरही नसावी. परभणीला भेट देऊन ते उगीच कशाला संविधानाला महत्व देतील. त्यांचे महयुतीचे प्रतिनिधी म्हणून ना. रामदास आठवले आणि मा. आ. जोगेंद्र कवाडे हे येऊन गेलेतच ना !
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मात्र आश्चर्य वाटते की ते कांहीही बोलून जातात. लोकसभेत तर ते नुसत्या कविता करतात, त्यामुळे ते काय बोलले ते नुसते हसून विसरुन जायचे असते. परभणीत ते छातीठोकपणे म्हणाले की, “ज्यांना भारतीय संविधान मान्य नसेल त्यांनी भारतात राहू नये !” आता हे कुणी सिरियसली घेतले काय ?
तिकडे छगन भुजबुळ रडत बसले आहेत की, देवा भाऊ यांनी त्यांना मंत्री केले नाही ! आता बास झाले की आणखी किती वेळा मंत्री होता ? ओबीसींची मते खेचण्यासाठी तुम्हाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात भुंकण्यासाठी सोडले होते. आता काम संपले. राज्यात बहुसंख्य असलेल्या माळी समाजाप्रमाणे धनगर समाजालाही मंत्रीमंडळातून डावलण्यात आले. गोपीचंद पडळकराने भाजपसाठी नुसत्याच मांड्या ठोकून भाषणे करायची असतात.
लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या तीन्ही ओबीसी नेत्यांनी मंत्रीपदाचा शोक करीत बसण्यापेक्षा परभणीला भेट दिली असती तर त्यांचे मोठेपण आणखी वाढले असते. पोलिसांच्या मारहाणीत मरणारा सोमनाथ हा ओबीसी आहे पण एकाही ओबीसी नेत्याने अद्याप परभणीला भेट दिली नाही. संख्येने बावन्न टक्के असलेला ओबीसी तीन टक्केवाल्याकडे सत्तेची भीक मागतो हीच फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर मा. कांशीरामजी यांनी नारा दिला होता, “वोट हमारा, राज तुम्हारा, नही चलेगा, नही चलेगा !”
या प्रकरणाकडे पाहिले तर भारतातील लोकशाही व्यवस्था उध्वस्त होत आहे की काय असे वाटत आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समिती समोर भाषण करताना म्हणाले होते, “भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात येईल, त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल. लोकशाही विषमतेने भरलेली आहे. सामाजिक व आर्थिक परिस्थितीने त्रासलेली जनता चुकीचे राजकीय नेते सत्तेत आल्यास ही जनताच लोकशाहीचे मंदिर उध्वस्त करेल..!”
परभणीत पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीचार्जचा वापर केला, मग संतप्त झालेल्या जमावातील कांही जणांनी दगडफेक व रस्त्यावर टायरची जाळपोळ केली ! याचे आम्ही समर्थन करीत नाही. याची निष्पक्ष चौकशी करुन पोलिसांनी रितसर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते पण तसे झाले नाही. पोलिसांनी दलित वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन करीत घरात घुसून दिसेल त्याला बेछूट व बेदम मारहाण केली. बाया आणि पोरींनाही सोडले नाही. सरसकट चारशे लोकांवर गुन्हे दाखल केले. हे असे सूडबुद्धीचे आदेश पोलिसांना कुणी दिले देवा भाऊ ? कांही बोलाल काय ?
गुन्हेगाराच्या यादीत पहिले नाव कालवश विजय वाकोडे यांचे टाकण्यात आले. यांनी दंगल केली काय ? यांनी जाळपोळ केली काय ? याच यादीत वीस क्रमांकावर कालवश सोमनाथ सुर्यवंशी यांचे नाव आहे. त्यांनी जाळपोळ किंवा दगडफेक केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे काय ? कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ संवैधानिक मार्गाने रस्ता रोको आंदोलन करतानाचा फोटो आमच्या हाती आला आहे. असे असतांना त्याला एकदम मरेपर्यंत मारहाण तुमच्या पोलिसांनी का केली ? जवाब दो देवा भाऊ !
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट (प्राथमिक अहवाल) समोर आला आहे, त्यातून समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण ! यातून पोलिसांची बनवेगिरी उघडी पडली आहे. ह्रदयविकाराने नाही तर अति मारहाणीमुळे व जखमांमुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे ! आता असे म्हणू नका की, सोमनाथने आत्महत्या केली. पोलीस स्वतःच्या बचावासाठी कोणत्याही थराला जातात. शिवाय त्यांना तुमच्यासारख्या लबाड राजकारण्यांची छूपी साथ असतेच ना देवा भाऊ ?
परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशीचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठविण्यात आले. तेथे शवविच्छेदनासाठी सोळा तास विलंब झाला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रेताची ओळख परेड तेथे ठेवण्यात आली. त्यासाठी त्याच्या आईला पाचारण करण्यात आले होते. चाकणहून त्या निघाल्याच होत्या. त्यासाठी वेळ लागणारच होता. त्यांच्यासाठी फडणवीस शासन विमान किवा हेलिकॅप्टर थोडेच पाठविणार होते ? निवडणूक प्रचारासाठी नेत्यांनाच या सेवा उपलब्ध होत असतात. त्यावेळी त्यांना अजिबात वेळ वाया घालवायचा नसतो. आता मंत्रीमंडळ स्थापनेसाठी कितीही वेळ लागला तरी व कितीही दिल्लीवाऱ्या झाल्या तरी चालते. मी तुमच्यासाठी हे करतो, ते करतो अशी आश्वासने देणारी ही नेते मंडळी स्वतःच्या मंत्रीपदासाठी दिल्लीश्वरांना कंबर मोडेपर्यंत वाकून कुर्निसात घालत होते.
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. याचे मंत्रीपदासाठी हपापलेल्या पुढाऱ्यांना कांहीही देणेघेणे नाही असेच त्यांचे आजवरचे वर्तन दिसून आले. माझ्या ओबीसी हिंदू बांधवाचा मृतदेह घाटीत सडत आहे, मला मंत्रीपद मिळो की ना मिळो, मी परभणी आणि संभाजीनगरला धाऊन जातो अशी माणुसकी एकानेही दाखविली नाही. अगदी परभणी जिल्ह्यातील मेघना बोर्डीकर यांनीही मंत्रीपद मिळाल्याशिवाय नागपूर सोडले नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली विलंबाने का होईना सोमनाथचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण *Shock following multiple injuries* असे नमूद करण्यात आले आहे. यावरुन आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा राजकीय लाभ घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पुढारी आता परभणीचे दौरे करतील. बैठका व सभा घेऊन भाषणाच्या फैरी झाडतील !
वैद्यकीय अहवालामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कांही गंभीर स्वरुपाचे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता. या ठिकाणीही शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत मुक्काम ठोकला आहे. ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राजकीय नाही तर सामाजिक जाणिवेतून आपले कर्तव्य चोख बजावले आहे. सोमनाथच्या अंत्यविधीतही ते समंजसपणे सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीचा प्रशासकीय यंत्रणेवर चांगलाच प्रभाव दिसून येत होता.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण, शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमनाथ सुर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन बहुजन आघाडीचा सक्रीय कार्यकर्ता होता. परभणीतील एका महाविद्यालयातून तो कायद्याचे शिक्षण घेत होता. आम्ही त्याच्यासाठी न्यायाची लढाई लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांनी उशिरा का होईना पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. फुले शाहू आंबेडकरांची त्यांची भाषणे कमी झाली असली तरी सामाजिक बांधिलकी थोडीच विसरता येणार ? शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा आपल्या मोबाईलमधून एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून फक्त व्हिडीओ शुटिंग/ रेकॉर्ड करत होता. कदाचित याचा राग मनात धरुन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली असावी. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा अखेर बळी ठरला. पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
त्यांच्या पक्षाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार बंडू जाधव हे परभणीतच राहतात पण त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशीच राहिली आहे. विरोधी पक्ष म्हणून ते शासन प्रशासनाला टार्गेट करीत असले तरी आंदोलकांचे त्यांनी अद्याप समर्थन केले नाही. उलट व्यापाऱ्यांना चुचकारण्याचे काम ते करीत आहेत. तुम्ही दुकाने चालू ठेवा, मी आहे ना ! अशी भाषा त्यांनी वापरली आहे.
आणखी एक दुःखाची बाब म्हणजे परभणीतील सामाजिक चळवळीचा एक ढाण्या वाघ सन्माननीय विजय वाकोडे यांचे ह्रदयविकाराने सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले आहे. परभणीच्या ललाटी हा दुसरा आघात आहे. हे परभणीकरांसाठीच नाही तर राज्यातील दलित व बहुजन चळवळीसाठी धक्कादायक वृत्त आहे. सोमनाथ सुर्यवंशीच्या जाण्याने दुःखी झालेल्या परभणीकरांना संघर्ष योद्धा विजय वाकोडे यांच्या आकस्मिक जाण्यानेही दुःखाच्या महासागरात लोटून दिले आहे.
आपल्या अंगावर दंगलीच्या गुन्ह्याची केस घेऊन विजय वाकोडे मरण पावले आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन ही व बाकी सर्व केसेस काढून घेईल काय ? सोमनाथच्या अंत्यविधीसाठी अतिशय घाईगडबड करण्यात आली असेही म्हणता येत नाही, कारण बराच विलंब झाला होता. मृतदेह जास्त काळ ठेवण्याची कुणीही रिस्क घेतली नाही. उपरोक्त पोलीस कर्मचाऱ्यांवर कांही तरी कठोर कारवाई व्हायला हवी होती. त्याशिवाय अंत्यविधी होणार नाही असा पवित्रा घेतला असता तर कांहीही झाले असते. प्रशासन झुकले असते पण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ही रिस्क घेतली नाही. यापुढील कायदेशीर लढत देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. ते समंजस नेते आहेत आणि त्यांचा कायद्यावर व न्यायावर विश्वास आहे.
सोमनाथच्या अंत्यविधीमध्ये विजय वाकोडे हे देखिल सहभागी झाले होते. या सर्व प्रकरणात त्यांनी आंबेडकरी समाजाचे नेतृत्व समर्थपणे केले होते. याचा तणाव त्यांना आला असावा. त्यातच रात्री घरी आल्यावर त्यांचा ह्रदयविकाराचा झटका येऊन लगेच मृत्यू झाला. एवढे कमजोर तर ते नव्हते पण ताणतणावाचे काय सांगावे ? माणूस कितीही भारी भरकम असला तरी ह्रदय तर नाजूकच असते.
सामाजिक चळवळीचा एक ढाण्या वाघ म्हणून विजय वाकोडे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते. केवळ दलित व बौद्धच नाही तर मातंग, ढोर, चांभार या अनुसूचित जातीतील सर्व घटकांना त्यांनी न्याय मिळऊन देण्याचा प्रयत्न केला आहे. माळी मराठा मुस्लीम समाजालाही अभय देण्याचे काम त्यांनी केले आहे. बहुजन समाजाचे ते पाठीराखे होते. त्यामुळे संपूर्ण परभणी शोकसागरात बुडणे साहजिक आहे. परभणीचे दोन्ही डोळे पाणावले आहेत. नियतीचा खेळ पहा, सोमनाथच्या दुःखातून सावरायच्या आतच परभणीकरांना दुसरा धक्का विजय वाकोडे यांच्या आकस्मिक मृत्यूचा बसला आहे. असा नेता आता पुन्हा होणे नाही.
दलित शोषित उपेक्षित समाजाने भविष्यात सावध पावले उचलणे आवश्यक आहे. भविष्यात परिस्थिती आणखी विचित्र बनू शकते. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाना वारंवार छेडल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही भडकू नका आणि कायदा हातात घेऊ नका. तुमच्या भावना दुखावल्या म्हणून सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना वेठीस धरु नका, कारण हे सरकार तुम्हाला शहरी नक्षलवादी म्हणून तुमचा करेक्ट कार्यक्रम करु शकते, त्यावेळी वाचविण्यासाठी विजय वाकोडे यांच्या सारखे धाडसी नेतृत्वही असणार नाही. आयु. प्रकाश आंबेडकर यांचेही वय वाढत चालले आहे. मायावती यांना तर भाजपने उत्तर प्रदेशात जखडून टाकले आहे. चंद्रशेखर आझाद हे लांब उत्तर प्रदेशात राहतात. ज्यांना आम्ही पुरोगामी म्हणून भरभरुन मते दिली ती काँग्रेस आता कोणत्या बिळात लपली हे दिसत नाही. खिशात संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी परभणीत संविधानाचा मुडदा पडत असतांना डोळ्यावर पट्टी बांधून झोपलेत काय ?
बांगला देशातील हिंदूंवर अन्याय झाला तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्त्या झाली म्हणून काँग्रेस खासदारांनी आज दिल्लीत निदर्शने केली, त्यांनी परभणीचा विषय तितका महत्वाचा वाटला नसेल ! मस्साजोग येथे मरणारा आणि मारणारे हे दोघेही प्रस्थापित आहेत. हे वैयक्तिक दुष्मनीतून घडले आहे. त्याला सामाजिक संदर्भाची किनार नाही. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेऊन मयत संतोष देशमुखच्या परिवारासाठी एका तासात चौदा लाख रुपये जमा केले आहेत. अजून पैसे जमा करण्यासाठी ते मदतफेरी काढणार आहेत म्हणे !
परभणीमध्ये कालवश सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्यासाठी कोणत्या आमदार खासदाराने पुढाकार घेऊन मदतनिधी जमा केली नाही. ईथे घरची भाकर खाऊन चळवळ चालवावी लागते आणि रस्त्यावर प्राण सोडावे लागतात, म्हणून निवडणुकीत आपण विकले न जाता आपली माणसे निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! बाबासाहेबांनी आम्हाला राजकीय जमात बनण्याचा संदेश दिला आहे. बाबासाहेबांसाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही वाट्टेल ते करायला तयार होतोत पण त्यांचा राजकीय विचार कामयाब करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसून येत नाही. हे केल्याशिवाय आम्ही आंबेडकरवाद रुजऊ शकणार नाही.
ही मी माझ्या आंबेडकरी समाजाला कमजोर समजून भीती घालत नाही पण भविष्यातील आमची आंदोलने अतिरेकीपणाची नाही तर संवैधानिक लोकशाही मार्गाने शांत व संयतपणाची असली पाहिजेत ! हिंदू हिंदू म्हणून संघवादी ओबीसीला देवाधर्माच्या नादाला लाऊन त्यांच्या मतावर डल्ला मारत असतात. आता सत्तेत त्यांचा असलेला नगण्य सहभाग आणि तीन साडेतीन टक्केवाल्याची मक्तेदारी कशी संपवायची हे आम्ही ओबीसींच्या डोक्यात व्यवस्थित उतरविले पाहिजे. आज भयभीत झालेल्या मुसलमानांना जवळ घेतले पाहिजे, तरच आम्ही सत्ताधारी होऊ शकतो आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचे स्वप्न साकार करु शकतोत !
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
अध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद
मो. 855 499 53 20, नांदेड