नांदेड- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत भारतीय स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आणि स्वतःकडे अंतर्मुख होण्याचा संदेश देणारे सेल्फी हे दोन अंकी नाटक गोपाला फाऊंडेशन, परभणीच्या वतीने सोमवारी (ता.२) यशस्वीपणे सादरीकरण करण्यात आले. सुप्रसिद्ध लेखिका शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक स्त्रीच्या जीवनातील संघर्ष, तिच्या अंतर्मनातील घुसमट, आणि समाजाने लादलेल्या विविध बंधनांवर संवेदनशील भाष्य करते.
नाटकाचे शीर्षक सेल्फी आजच्या डिजिटल युगात स्वतःकडे नव्याने पाहण्याचा, स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा आग्रह करते. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवून नाटकाच्या कथानकात पाच स्त्रियांचे प्रवास उलगडले आहेत. रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये आपापल्या प्रवासाची वाट पाहणाऱ्या या पाचजणींमध्ये सुरू झालेला संवाद हळूहळू त्यांच्या आयुष्याच्या जटिल प्रवासाचा आरसा बनतो. वरवर सुखात आणि परिपूर्ण आयुष्य जगत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या या स्त्रिया, प्रत्यक्षात मात्र सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर संघर्ष करत आहेत.
नाटकातील मुख्य पात्रांमध्ये मध्यमवयीन स्वाती (कल्पना कुलकर्णी) ही एक गृहिणी आहे, जी सतत आपल्या परिपूर्ण संसाराचा डंका पिटवत असते, पण आतून मात्र ती स्वतःला हरवून बसलेली आहे. विभा (सुषमा कुलकर्णी), एक प्राध्यापिका, जी मूल नको असा ठाम निर्णय घेतल्याचे दाखवत असली तरी प्रत्यक्षात मूल होण्यासाठी व्याकुळ आहे. मिनाक्षी (कांती दैठणकर) ही उच्च पदावर असलेली अधिकारी आहे, जी लग्नाला नकार देत प्रेमाच्या शोधात भटकते, पण अपेक्षित जोडीदार न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करते. तनुजा (पूनम श्रीरामवार) ही दोन वेळा विवाहबंधनात अडकूनही समाधान न मिळाल्यामुळे अस्वस्थ आहे. तर शाल्मली (सीमंतिनी कुंडीकर) ही टीव्ही अभिनेत्री आहे, जी गरोदरपणाची बातमी समजल्यानंतर आपले करिअर धोक्यात येईल या भीतीने अस्वस्थ आहे. या पाच स्त्रियांच्या संवादातून बाहेरून सुखी वाटणाऱ्या स्त्रियांचे अंतरंग हळूहळू प्रेक्षकांसमोर उलगडते. स्त्री म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणी, सामाजिक दबाव आणि त्यांच्या स्वप्नांच्या उड्डाणावर येणाऱ्या मर्यादा यांचा वेध घेत नाटकाची कथा पुढे सरकते. त्यांच्या अंतर्मुख प्रवासात एकमेकांचे अनुभव आणि संवेदना उलगडताना, या स्त्रिया स्वतःला नव्याने समजून घेतात. नाटकाचे दिग्दर्शन स्नेहल किशोर पुराणिक यांनी केले असून, प्रत्येक पात्राची अंतर्गत अवस्था प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभी करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. नेपथ्याच्या जबाबदाऱ्या अर्चना सिद्धार्थ नागठाणकर आणि द्रोपदी भगत यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडल्या. प्रकाश योजनेंतर्गत साक्षी नारायण त्यारे आणि अनुष्का पुराणिक यांनी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप प्रकाशयोजना केली. रंगभूषा व वेशभूषेसाठी उषा कुडूंकर आणि ऐश्वर्या पुराणिक यांनी पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय दिला. पार्श्वसंगीतासाठी रेणुका पुराणिक आणि उज्वला पाटीत यांनी मेहनत घेतली असून, त्याने नाटकातील भावनिक क्षण अधिक प्रभावी झाले. सहाय्यक भूमिकांमध्ये चायवाला (विश्वजीत खरात), समोसेवाला (शुभम गोरे), आणि प्रवासी १ ते ४ म्हणून वैजनाथ बनसोडे, प्रतिक कांबळे, मधुकर भगत, अतुल पांचाळ यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरीत्या साकारल्या. रंगमंच व्यवस्थापनासाठी संगीता किरण डाके आणि शारदा हरिभाऊ कदम यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.