दयनीय माजी मुख्यमंत्री शिंदे !!; भाजपाचे निर्दयी हायकमान !

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत ..

मुंबई: ‘दयनीय’ या शब्दाचा खराखुरा अर्थ शोधायचा असेल तर साता-यातील दरे गावात दडून बसलेल्या मामु एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी. अर्थात आपली ही दयनीय अवस्था आपल्या चाहत्यां प्रमाणेच विरोधकांच्या दृष्टीस पडू नये,यासाठी मामु एकांतवासात गेले असावेत. शिंदे सेनेचा पोपट दिपक केसरकर यांनाही चक्क माघारी परतावे लागले मग प्रसिद्धी माध्यमांचे काय घेऊन बसलात राव ! दोन दिवस आपल्या हायटेक शेतीची पांढ-या शुभ्र पेहरावात व काळे कुळकळीत चकचकित बुट घालून पाहणी करणारे शिंदे साहेब अचानक आजारी पडले, यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. कारण अतिताण व भ्रमनिराशेमुळे जो ताण पडतो ( stress) त्याचा मानवी देहावर परिणाम होणे नैसर्गिक असते. कोणाच्याही आजारपणाचे राजकिय भांडवल करता कामा नये व होता कामा नये. १८-१८ तास सतत अडिच वर्षे काम केले, अनेकदा सलाईन लावूनही कामात खंड पडू दिला नाही, दोन वेळा कोरोना होऊन ही रूग्णालयातूनही फाईली क्लियर करण्याची तत्परता ज्या नेत्याने दाखवली, त्याचा आत्ता अतिताण पडून आजारी पडले तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये, ते देखील एक मनुष्यप्राणी आहेत व ते आजारी पडणे हे नैसर्गिक आहे.

 

मामु एकनाथ शिंदे यांचा आजार राजकिय असल्याचा नाठाळपणा विरोधक करीत असतील तर तो त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. महाराष्ट्राचे मा मु लवकर बरे व्हावेत, Get well soon ! अशी शुभेच्छा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते तणामुक्तिसाठी दोन दोन हॅलिपॅड असलेल्या आपल्या गावी गेले, यात काय चुकिचे आहे ? मात्र एक कळत नाही की, गेली २० वर्षे आमदार, विरोधी पक्ष नेता, कॅबिनेट मंत्री व अडिच वर्षे मुख्यमंत्री पद लाभूनही ते आपल्या गावी एक सर्व सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल का उभारू शकले नाहीत ? निदान १० वर्षे खासदार असलेल्या डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने तरी असे हॉस्पिटल का उभारले नाही ? हा प्रश्न या वेळी उपस्थित करणे योग्य नाही. मामु जे सद्या काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत, व ते म्हणतात की, मी सर्वांची काळजी घेतो, मग त्यांच्यावर मुंबईहून डॉक्टरांचे पथक मागवण्याची नामुष्की का बरे यावी ?

 

त्यांचे सुपुत्र डॉ. शिंदे हे देखील तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांनी तरी आपले पथक बाबांसोबत ठेवायला हवे होते ! आमचा स्पष्ट आरोप आहे की, त्यांची तब्येत बिघडण्यास मोदी- शहा व फडणवीसच जबाबदार आहेत. त्यांची वाजवी मागणी होती की, मला अडिच वर्षे मुख्यमंत्री पद द्यावे. गेल्या वेळी ४० आमदार असताना तुम्ही मुख्यमंत्री पद देता तर मग आत्ता तर ५७ आमदार असताना मुख्यमंत्री पदाची मागणी का झिडकारता ? कित्ती कित्ती निष्ठूर आहात तुम्ही ! ज्याने तुम्हाला विरोधी पक्षातून सत्ताधारी बनवले, त्याच्याशी तुम्ही गद्दारी करता ! अनाजी पंत व अमितशाही सायबांनो तुमचे हे वागणे बरे नव्हे ! तुम्ही जर एक वर्षासाठी तरी मामुंना मुख्यमंत्री पद दिले असते तर ते बिलकूल आजारी पडले नसते, उलट दिवस रात्र रार राब राबले असते.

 

आमचे मामु इतके दिलदार निघाले की ते मागिल उपकार विसरून उपमुख्य मंत्री पदावर राजी झाले. आपल्या हक्काच्या मुख्यमंत्री पदावर तुळशीपत्र ठेवले व स्वत: शिवसेनेचे पक्ष प्रमुख असूनही “भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंद्य असेल”, असे धीरोदात्त उद्गार काढले. महाराष्ट्रातच्या इतिहासातील असे न भूतो न भविष्यती असे बाणेदार नेतृत्व महाराष्ट्राच्या ६४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच उदयास आले.अशा महान नेत्याची व त्याच्या पक्षाची अशी अवहेलना केल्यावर सह्रदयी नेता आजारी पडणार नाही तर काय होणार ?

 

आत्ता मामु एकनाथ शिंदे यांना बरे वाटावे अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना उपमुख्यमंत्री पदाबरोबर हवे असलेले गृहमंत्री पद देऊन टाकायला काय हरकत आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदावर राहून ठाकरेंच्या शिवसेनेची जी वाताहात लावली ती अजून पूर्ण झालेली नाही. अनेकांना तडीपार केले, अनेकांवर गुन्हे नोंदवले, अनेकांचे जुने गुन्हे उकरून ब्लॅकमेल केले, शाखा ताब्यात घेतल्या, गर्भवती महिलेस गर्भपात होईपर्यंत मारणा-यांना अभय दिले,अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या शाळेचा संचालक बदलापुरचा आपटे असो कि मालवण मधील निकृष्ठ शिवपुतळा बनवणारा आपटे यांना अभय देण्याचे कर्तव्य बजावले, बलात्कारी अक्षय शिंदे याचे एनकाऊंटर करवून तोंड कायमचे बंद केले,असे किती तरी पराक्रम केले आहेत.

 

इतके करूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना संपत नाही, निष्ठावंत मागे हटत नाहीत, ठाकरेंची शिवसेना संपवण्याचे मिशन जे तुम्हीच दिले होते ते अपुर्ण असूनही तुम्ही मामु एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद देत नसाल तर एका महत्वाकांशी नेत्यावर तुम्ही घोर अन्याय करीत आहात.याचा निषेध पोपट दिपक केसरकर वा संजय शिरसाट करणार नाहीत कारण त्यांची दुहेरी निष्ठा आड येते. मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला मंत्री पद हवे ! हेच त्यांचे धोरण आहे.

 

उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सहजासहजी संपवणे अशक्य आहे, मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी व मामु एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवण्याचे तुम्ही ठरवलेच आहे. २०२९ ला भाजपा स्वबळावर सत्ता आणण्याची शहांची गर्जना तरी हे दर्शवते. तुमच्या या पवित्र कार्यास यश मिळो, ही आई भवानी चरणी प्रार्थना तसेच “दुर्दैवाचे दशावतार याची देही याची डोळा पाहण्यासाठी” कामाख्या देवीने मामु एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य द्यावे, ही प्रार्थना !

 

-जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!