मानसिक आजाराची उकल करणारे ‘पुन्हा एकदा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर

 

नांदेड- शहरात सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीत आता रंगत येत आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी जेष्ठ रंगकर्मी राजीव किवळेकर यांची निर्मिती असलेल्या सुहास देशपांडे लिखित रवी शामराज दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा’ या दोन अंकी नाटकाच्या आगळ्या वेगळ्या विषयाने व अभिनयाच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली.

दोन जगात वावरणाऱ्या व्यक्तींच्या एमनेशिया या दुर्धर मानसिक आजाराची उकल लेखकाने समर्थपणे लिखाणातून मांडून अशा व्यक्ती आसपास असल्या तर त्यांच्याशी सामाजिक जाणिवेतून योग्य संवाद साधला पाहिजे असा संदेश यातून दिला आहे.

एकाकीपणे राहणाऱ्या साहित्यिक लिखाणाची हौस असणाऱ्या वयोवृद्ध सदाशिवाची (रवी शामराज) या पात्राभोवती हे नाटक फिरते. त्यांना त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि तेथून तो आपल्याला संवाद करतो अशी सतत कल्पना खेळ करीत असतात.

त्यांना ओळखणारी रचना (वर्षा फुलपगार) त्यांच्यामध्ये आपले वडिलांसमान असणारे गावी असणारे सासरे तात्या पाहते आणि घरी काही दिवसासाठी सदाशिव यांना घेऊन घरी येते आणि रचनाचा व्यावसायिक असणारा नवरा नकुल कारखानीस (सुहास देशपांडे) आणि रचना यामध्ये खटके उडायला सुरुवात होते. नकुल सदाशिव ला वेडे म्हणतो ते रचनेला अजिबात आवडत नसते. नकुल आणि सदाशिव चे कधी वाद तर कधी घरातली ड्रिंक पार्टी सुरु असते. एक दिवस रचना गावाकडे तात्यांना भेटायला सदाशिवना घेऊन जाण्याचा पराकोटीचा हट्ट करते तेव्हा नकुल नेहमीप्रमाणे विरोध करतो पण सदाशिव वरून रचनाबरोबर चे वाद अगदी विकोपाला जात असताना नकुलचा मित्र डॉ. सुशील सराफ श्रीपाद कासराळीकर यांची नाटकात एंट्री होते आणि नाटक एक रोमांचकारी वळण घेते.

एमनेशिया या मानसिक रोगाचे सदाशिव सोडून रचना पण आजारी असल्याचे निष्पन्न होते. तिच्या साठीच सदाशिव यांना घरात आणण्याचे नियोजन डॉ. सुशील आणि नकुल यांचे असते. पण पुढे डॉ. सुशील आणि रचना यांच्यात साध्या कारणावरून वाद होतो आणि ती डॉक्टरला घराबाहेर काढते. मग नकुल रचनेला हाताशी धरून सदाशिवच्या साहित्य संपदावरून एक मोठा डाव खेळतो. यामध्ये तो यशस्वी होतो का, रचना व सदाशिव बरे होतात का, गावाकडील तात्यांचे काय होते याचा उत्कंठावर्धक शेवट प्रत्यक्ष अनुभवने अत्यंत रोमांचकारी आहे. नकुल ची भूमिका करणारे सुहास देशपांडे यांनी खेळकर तर कधी हट्टी तर कधी त्रागा करणारा नवरा यशस्वी साकार केला आहे. सदाशिव ची भूमिका करणारे जेष्ठ रंगकर्मी प्रा. रवी शामराज यांनी अगदी बेमालूम मनोरुग्ण साकारून रसिकांची सहानभूती मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. नकुल व सदाशिव यांची भावपूर्ण अभिनयाची जुगलबंदीने नाटकास वेगळ्या उंचीवर नेले आहे. वर्षा फुलपगार या समर्थ अभिनेत्रीने बऱ्याच काळानंतर रंगमंचावर पदार्पण करून जबाबदार पत्नी, तात्यावरील पितृप्रेम , सदाशिव बाबत निग्रही असणारी असे अनेक पदर असणारी रचनाची भूमिका सुंदर साकारली आहे. श्रीपाद कासराळीकर यांनी डॉक्टर सुशील अगदी कमी वेळ असून सुद्धा प्रभावीपणे साकार केला आहे.

नाटक उत्कृष्ट होण्यासाठी अनेक योजना कार्यरत असतात. त्यामध्ये कल्पक प्रकाशयोजना करणारे नंदन फाटक व दीपक मुळे, अधून मधून जगजीत सिंग यांच्या गझलेची कल्पक जोड देऊन प्रत्येक दृश्य उठावदार करणारे संगीत देणारी जिगीषा देशपांडे, रंगभूषा योजना सौ. भारती शामराज, वेशभूषा योजना समर्थ पणे सांभाळणाऱ्या सौ. अंजली किवळेकर, नेपथ्य योजना यशस्वी करणारे लक्ष्मण संगेवार आणि सौ. स्वाती देशपांडे, रंगमंच व्यवस्था सांभाळणारे लक्ष्मीकांत सावंगीकर या सर्वांचा मोलाचा वाट नाटकाच्या यशस्वीतेत नक्कीच आहे.

नाटकास रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ६ डिसेंबर पर्यंत होणारी ही प्राथमिक फेरीतील नाट्यस्पर्धा यशस्वी होण्यासाठी समन्वयक किरण चौधरी व त्यांची टीम परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!