नांदेड :- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता.२६) ‘व्हाईट पेपर’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आले. दिनेश कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली इरफान मुजावर लिखित या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. जातीय आणि धार्मिक समन्वयाचा मुद्दा मांडणाऱ्या या नाटकाने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
नाटकाचा मुख्य गाभा गावातील ऐतिहासिक जागेभोवती फिरतो. त्या जागेचा इतिहास नव्याने लिहिण्यासाठी स्थापन झालेल्या कमिटीमध्ये विविध जाती-पंथांच्या व्यक्तींचा समावेश असतो. मात्र, आपल्या धर्माशी ती जागा जोडलेली असल्याचा दावा प्रत्येक जण करत असतो. याच पार्श्वभूमीवर गावात वादळ उठते. यासोबतच, जातीय भेदभावाच्या छायेतून राहुल आणि माधुरीच्या प्रेमकथेला रंगमंचावर उतरवण्यात आले आहे. यातील एक संवाद, “हे लोक इतिहास विसरण्यास तयार नाहीत आणि तू भविष्याचा विचार करतेस,” नाटकाचा सार स्पष्ट करतो. चर्चा नाट्य होऊ शकणाऱ्या या कथानकाला खेळत ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.या नाटकात अक्षय राठोड (सरपंच), शाम डुकरे (काँबळे), गौतम गायकवाड (चाचा), सुधांशू सामलेट्टी (भोसले), लक्ष्मीकांत देशमुख (मास्तर), अजय पाटील (वसंत काळे), संदेश राऊत (मनोहर निकम), सपना वाघमारे (माधुरी), संदेश महाबळे (राहुल), प्राजक्ता बोचकरी (सुगंधा), मंजिरी वायकर पाटील (ऐश्वर्या उद्गावकर), मोहिनी मोरे (जाधवबाई), ऐश्वर्य हैबतकर (संताजी), अथर्व देसाई (मारुती), शिवरुद्र सातपुते (बज्या) आणि सुदाम केंद्रे (व्यक्ती) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.तांत्रिक बाजूंमध्ये श्याम चव्हाण आणि कैलास पोपुलवाड यांनी प्रकाश योजना, सुदाम केंद्रे यांनी संगीत संयोजन,किरण टाकळे,पूजा तरकंटे,गौतम गायकवाड यांनी नैपथ्य, शांती देसाई व सुधांशू सामलेट्टी यांनी रंगभूषा आणि वेशभूषा सांभाळली तर रंगमंच सहाय्य चक्रधर खाणसोळे व राहुल मोर यांनी योगदान दिले. प्रेक्षकांनी या नाटकाला प्रतिसाद दिला.