40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी

1 कोटी 48 लाख मंजुर; 54 लाखांची लाच मागणी ; असे अनेक प्रकार घडविणारे हे महाभाग
नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायाधीशांनी चार दिवस, 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुध्दा आता गोत्यात येण्याचे चित्र दिसत आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार एका तक्रारदाराने त्यांच्या अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे सन 2013 पासून थकलेले वेतन बिल 1 कोटी 41 लाख 48 हजार 3 रुपयांचे काढून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यात मुळ शिराढोणचे असलेले छत्रपती शाहु महाराज निवासी अपंग विद्यालय काबरानगर येथील लिपीक शिवराज विश्र्वनाथ बामणे (40), तक्रारदारदाराच्या निवासी अपंग शाळेत लिपीक पदावर असलेलीे चंपत आनंदराव वाडेकर (50) आणि वैभव निवासी शाळा खानापूर ता.देगलूर येथील मुख्याध्यापक यादव मसणाजी सूर्यवंशी यांनी 54 लाख रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम प्रलंबित थकीत वेतन बिल बॅंकेत जमा झाल्यानंतर बॅंकेतून काढून थेट यांना द्यायचे ठरले. त्यातील 40 लाख रुपये दुचाकीवर बसून घेवून जात असतांना शिवराज विश्र्वनाथ बामणे आणि चंपत आनंदराव वाडेकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बिरसा मुंडा चौकात ताब्यात घेतले. लाचेचे 40 लाख रुपये रोख रक्कम आणि सोबत शिवराज बामणे यांच्या ताब्यातील त्यांची स्वत:ची 98 हजार 540 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल सुध्दा पोलीसांनी जप्त केला.
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 तील कलम 7 (अ) नुसार गुन्हा क्रमांक 590/2024 दाखल झाला. या प्रकरणाचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक गजानन बोडके यांच्याकडे देण्यात आला. आज गजानन बोडके, पोलीस अंमलदार राजेश राठोड, वडजे, रापतवार आणि प्रकाश मामुलवार आदींनी शिवराज विश्र्वनाथ बामणे (40) आणि चंपत आनंदराव वाडेकर (50) या दोघांना न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी न्यायालयासमक्ष पोलीस कोठडीच्या आवश्यकतेचा मुद्दा मांडला. तदर्थ न्यायाधीशांनी या दोघांना चार दिवस अर्थात 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या युक्तीवादामध्ये या लोकांनी जिल्हा परिषदेमधील समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या नावावर ही लाखो रुपयांची लाच घेतली आहे. या वरून सत्येंद्र आऊलवार सुध्दा अडचणीत येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज जिल्हा परिषद कार्यालयात चक्कर मारली तेंव्हा त्या ठिकाणी अनेक जण शिवराज बामणे, चंपत वाडेकर, यादव सूर्यवंशी हे तिघे सत्येंद्र आऊलवार सोबत संगणमत करून अशी अनेक कामे करत होते. काही जणांना नोकऱ्या लावतो म्हणून पैसे घेतले आहेत, काही शाळांमध्ये खोटे कागदपत्र असतांना सुध्दा शिक्षकांच्या पदांना मंजुऱ्या दिल्या आहेत. ज्या वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक यांच्या घरात झडती घेण्यासाठी गेले. त्यांच्या घराचे वैभव पाहुन पोलीस पथकाचे सुध्दा डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती.एकूण जिल्हा परिषदेमध्ये ऐकू आलेल्या चर्चेप्रमाणे या सर्वच लोकांची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!