विधानसभा निवडणुका आज मतमोजणीनंतर पार पडल्या. या निवडणुकासंदर्भाने जनतेते ऐकू येत असलेला कौल समोर आला नाही. त्यापेक्षा उलट झाले. म्हणून ही निवडणुक म्हणजे ईलेक्शन मॅनेजमेंटमध्ये जिंकण्यात आली अशी चर्चा आज दिवसभर असंख्य नामांकित पत्रकार करत आहेत. पत्रकारीतेमध्ये शोध पत्रकारीता या विषयाला खुप मोठे स्थान आहे. म्हणून या निवडणुकीसंदर्भाची शोध पत्रकारीता करून पत्रकारांनी यातील सत्य शोधावे. कारण पत्रकारांची दृष्टी पोलीसांसारखी शंकेपासूनच सुरू व्हायला हवी. आज आलेल्या निकालाचा विरोध नाही. परंतू त्यातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हरीयाणापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झाले आहे. हरीयाणामध्ये मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे 15 लाख मत वाढले होते आणि महाराष्ट्रातील वाढवलेल्या टक्केवारीमुळे 10 लाख मते वाढली आहेत. हा नक्कीच कोठे तरी गडबड घोटाळा आहे. पण तो शोधणे शिल्लक राहिले आहे.
विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर सर्वात अगोदर शासनाच्यावतीने जवळपास 64 टक्के मतदान होईल असे जाहीर करण्यात आले होते. मग रात्री उशीरा महाराष्ट्र विधानसभेत 65.2 टक्के मतदान झाले असे जाहीर करण्यात आले. 24 तासानंतर विधानसभेतील मतदान 66.05 टक्के आहे असे जाहीर करण्यात आले. मत पत्रिकेवर ज्यावेळेस मतदान होते. त्यावेळेस मतदान सायंकाळी 7 वाजता संपल्यानंतर 9 वाजेपर्यंत राज्यातील एकूण टक्केवारी जाहीर होत होती. आता सर्व बाबी तांत्रीक दृष्ट्या पुढारलेल्या असतांना सुध्दा 1.3 टक्के मतदान वाढलेले आहे हे सांगण्यासाठी 24 तास का लागले हा विषय मोठाच आहे. ज्यामुळे मतांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त झाली.
आज पत्रकार उमाकांत लखेडा, विवेक देशपांडे, प्रा.आनंदकुमार, दिपक शर्मा, सुधीर सुर्यवंशी, धर्मानंद कामद, प्रकाश पोहरे, पुनित निकोलस यादव, निलु व्यास, सिध्दार्थ शर्मा, अनिल सिना, संजय शर्मा, गिरीष जोशी, डॉ.संदीप यादव, अबिसार शर्मा, अखिल स्वामी, प्रशांत टंडन या नामांकित व्यक्तीमत्वांचे विश्लेषण ऐकले. त्या आधारावरच आम्ही म्हणत आहोत की, पत्रकारांचा विचार सुध्दा पोलीसांप्रमाणे शंकेपासूनच सुरू झाला पाहिजे. काही मतदार संघांमध्ये पुर्नर मतमोजणी सुरू आहे. काही मतदार संघांमध्ये व्हीव्हीपॅडमधील चिठ्ठ्यांसोबत मोजणी होण्याची मागणी झाली आहे. आज उमेदवारांनी दिलेल्या अर्जांच्या पुढची पायरी न्यायालय आहे. न्यायालयात पुढची विधानसभा निवडणुक येईपर्यंत निकाल येणार नाही. पण झालेल्या घटनेतील सत्य शोधण्यासाठी तो सुध्दा एक मार्ग आहे.
दोन तृतियांश बहुमतासह भारतीय जनता पार्टीला मिळालेली संख्या ही कोणाच्याही स्वप्नात नव्हती. लोकांच्याच नव्हे, विरोधी पक्षाच्याच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनात सुध्दा हा आकडा नव्हता. तो आकडा त्यांना मिळाला आहे. जशी-जशी मतमोजणी पुढे जात होती. सत्ताधिशांना 50 टक्के मतदान मिळाले आहे. चारच महिन्यापुर्वी याच सत्ताधाऱ्यांना हा मतदानाचा आकडा 25 टक्के सुध्दा पार झाला नव्हता. विरोधकांना मिळालेला मतदानाचा आकडा या निवडणुकीत 35 टक्के आहे. हा 15 टक्केचा फरक लोकशाहीतील मतदानामध्ये गळ्यात उतरणे अवघड आहे. म्हणून या निवडणुकीतील खेळाची शोध पत्रकारीता कोणी तरी केली पाहिजे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, महागाई, आरक्षण, शेतीच्या पिकांची किमान आधारभुत किंमत, बेरोजगारी या विषयांना वगळून जनतेने मतदान केले असेल काय? या विषयांची त्यांना गरज नाही काय? आणि असेल तर जनता 50 टक्के मतदान सत्ताधिशांना देईल काय? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. म्हणूनच या निवडणुकीतील फेरफाराचा मागोवा काढणे अत्यंत आवश्यक आहे. हा निकाल भारतीय जनता पार्टीला सुध्दा धक्कादायक आहे.
ज्या पध्दतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली. त्यात काही असेही मत पुढे येत आहे की, झारखंडचे बलिदान देवून महाराष्ट्र विधानसभा सत्ताधिशांनी जिंकली आहे. कारण सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारे राज्य महाराष्ट्र आहे. केंद्राच्या सरकारने अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न थोडाफार संपणार होता तो रोखला गेला आहे आणि पुढील पाच वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची लुट करण्यासाठी आता हे सरकार सज्ज होणार आहे. झालेल्या प्रकाराला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चिन आणि रशियाची युनाएटेड रशीया अशा प्रकारे जर भारतात घडणार असेल तर यापुढे भारतात निवडणुकाच घेवू नयेत असे मांडायचे आहे. कारण चिन आणि रशियामध्ये ज्या निवडणुका होतात. त्या फक्त नाममात्र असतात अशीच पध्दत भारतात लागू केली तर निवडणुकीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल तरी. त्यातून जनतेच्या भविष्यासाठी काही प्रकल्प उभारता येतील.
विधानसभा निवडणुक मतमोजणीनंतर भारत हा हिटलर शाहीकडे जात आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. काही दिवसांपुर्वी बांग्लादेशमध्ये सुध्दा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या आणि असाच एकतर्फी निकाल लागला होता. त्यानंतर झालेल्या परिस्थितीमध्ये बांग्लादेशच्या अध्यक्षांना देश सोडून पळावे लागले होते. कारण जनता रस्त्यावर उतरली होती असाच काहीसा प्रकार श्रीलंकेतही झाला होता. श्रीलंकेच्या जनतेने राष्ट्रपतीला आपल्या बंगल्यातून हाकलून त्या बंगल्याला आग लावली होती. असाच काही प्रकार भारतात घडणार नाही या अपेक्षासह थांबतो.
-रामप्रसाद खंडेलवाल