नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 ते 2019 दरम्यान गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सचखंड श्री हजुर साहिब यांच्या समक्ष भाविकांच्यावतीने करण्यात येणाऱ्या अखंड पाठ या प्रक्रियेत घोटाळा झाला. याबद्दल अनेक श्रदाळू लोकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि अखंड पाठ साहिबच्या घोटाळ्यातील 36 लाख 69 हजार 350 रुपयांचा अपहार करणाऱ्यांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 330/2024 उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झाला. ही याचिका अमृतपालसिंघ या व्यक्तीने दाखल केली होती. याची क्रमांक 1915/2023 चा निकाल 4 मार्च 2024 रोजी आला होता. आता वजिराबाद येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखा नांदेडकडे वर्ग झाला आहे.
सन 2017 ते 2019 दरम्यान अखंड पाठ साहिबसाठी 721 श्रदाळु लोकांनी आरक्षण केले होते. त्या एका धार्मिक प्रक्रियेसाठी 8 हजार 100 रुपये अशी प्रत्येकी फिस आहे. त्या सर्व 721 लोकांची एकूण रक्कम 36 लाख 69 हजार 350 रुपये होते. वजिराबाद येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तीन व्यक्तींना न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यांची नावे महिपालसिंघ लिखारी, धरमसिंघ झिलदार, रविंद्रसिंघ सुखई अशी आहेत. यातील एक व्यक्ती ठाणसिंग बुंगई हे त्यावेळेस गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक होते.या प्रकरणात ठाणसिंघ बुंगई ही सध्या अंतरिम जामीनीवर आहेत. याप्रकरणात माहिती न देणाऱ्या गुरुद्वारा बोर्डाच्या माहिती अधिकारी आणि अपीलीय अधिकारी यांना सुध्दा या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी झाली आहे.
दरम्यान या प्रकरणात दिपकसिंघ गल्लीवाले, विरेंद्रसिंघ बेदी, मनबिरसिंघ ग्रंथी, जसपालसिंघ लांगरी, जगजितसिंघ खालसा, बक्षीसिंघ पुजारी यांनी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना भेटून या प्रकरणाचा तपासीक अंमलदार बदलण्याची विनंती केली होती. यामध्ये पुर्वीचे तपासीक अंमलदार वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी 66 दिवस पंजाब भवन यात्रीनिवास येथे निशुल्क रुम घेवून तेथे राहत होते. त्यांना हे रुम ठाणसिंघ बुंगई यांनी उपलब्ध करून दिले होते.ही माहिती माहिती अधिकार कायद्यानुसार प्राप्त झाली होती. पोलीस उपमहानिरिक्षकांनी त्वरीत या प्रकरणात दखल घेत वजिराबाद येथे दाखल झालेला गुन्हा क्रमांक 303/2024 पुढील तपासासाठी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला आहे.
सचखंड श्री हजुर साहिब समोर अखंड पाठ ही सेवा घेणाऱ्या भाविकांसोबत झालेल्या या धोक्याबद्दल दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले यांनी सचखंड हजुर साहिबचे जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांना एक निवेदन देवून या अखंड पाठ साहिब घोटाळाप्रकरणातील 721 श्रदाळू लोकांसाठी पुन्हा एकदा अखंड पाठ साहिब आयोजित करावा अशी मागणी सुध्दा केली आहे. पण ही मागणी अद्याप पुर्ण झाली नाही असे दिपकसिंघ गल्लीवाले यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले. या निवेदनाच्या प्रति उर्वरीत पंचप्यारे साहिबान यांना सुध्दा दिल्या आहेत.