नांदेड(प्रतिनिधी)- काम 35 हजार 388 रुपयांचे आणि लाच मागणी 25 हजार रुपयांची असे कृत्य करणाऱ्या मौजे दुधड वाळकेवाडी येथील ग्रामसेवक आणि उपसरपंच अडकले आहेत. लाच मागणीच्या जाळ्यात. या संदर्भाने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका तक्रारदाराने अशी तक्रार दिली की, रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे दुधडवाडी/ वाळकेवाडी ता.हिमायतनगर अंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन 35 हजार 388 रुपये मिळविण्यासाठी ग्रामसेवक गजानन शामराव मुतनेवाड यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी उपसरपंच संजय शिवराम माझळकर यांना भेटण्यास सांगितले. तेंव्हा त्यांनी माझळकरांनी रोजगार सेवकाचे मानधन बॅंक खात्यात टाकण्यासाठी सुरूवातील 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाइलाजास्तव होकार दिला. पण ती लाच आहे ही खात्री झाल्यानंतर त्यांनी 16 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रार दिली. त्या अनुशंगाने 22 ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी झाली. त्यावेळी उपसरपंच माझळकर यांनी सरपंचाच्या नावाने स्वत:साठी 15 हजार व ग्रामसेवक मुतनेवाड यांच्यासाठी 10 हजार असे 25 हजार रुपये लाच मागणी केली. सोबतच तक्रारदाराने असेही सांगितले की, उपसरपंच यांनी ग्रामसेवक यांना बोलून खात्री करा असेही सांगितले. त्यावेळी मोबाईल फोनवर रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी बोलणे केले असता ग्रामसेवक मुतनेवाड यांनी स्वत:साठी 10 हजार आणि उपसरपंच संजय माझळकर यांनी त्यांच्यासाठी 15 हजार असे एकूण 25 हजार रुपये लाच मागीतली आहे. या संदर्भाने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार, पोलीस निरिक्षक संदीप थडवे यांच्या पथकाने ही कार्यवाही पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती प्रसिध्दीसाठी पाठवतांना जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.