सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांमध्ये खलबत शिजतात, त्यांना अंमलात आणले जाते आणि त्या खलबतांच्या जोरावर निवडणुकीचा विजय संपादन करण्याचे विविध मार्ग अवलंबिले जातात. हा खेळ राज्यभर सुरू आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने प्रा.गौतम दुथडेची उमेदवारी बदलून त्यांच्या जागी इंजि.प्रशांत इंगोले यांना उमेदवारी दिली. पण ती वंचितला फायदेशीर ठरेल काय? विशेष म्हणजे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजय मिळणार असेल आणि नसेल या दोन बाबींना वेगवेगळा विचार केला तर विजय न मिळण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत उमेदवार काय-काय फायदे उचलतात या खलबतांना कोण सुरक्षा देते हे सर्वात महत्वपुर्ण आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रा.गौतम दुथडे यांना उमेदवारी दिली. गौतम दुथडे हे नांदेडच्या एका नामांकित महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या प्राध्यापक कारकिर्दीत त्यांचे नाव नावाजलेले आहे. शिवाय हक्कांसाठी लढणे हे त्यांच्या रक्तात आहे. तरीपण जाहीर झालेली उमेदवारी काही दिवसांची बदलली आणि नांदेड येथील इंजि.प्रशांत इंगोले यांना ही उमेदवारी जाहीर झाली असो. राजकीय खलबतातला हा भाग आहे. पण खलबत करतांना ते यशस्वी होणे आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीत यशस्वीतेची काही मुल्ये नाहीत. कशाही पध्दतीने मिळो यश मिळणे महत्वाचे आहे. परंतू या यशावर चर्चा करतांना ईतिहास सुध्दा तपासला जातो आणि प्रशांत इंगोले यांना उमेदवारी देतांना तो ईतिहास तपासला गेला नाही असे वाटते.
20 वर्षापुर्वी चंद्रकांत हंडोरे यांच्याकडून 5 कोटी रुपयांचा एक प्रकल्प भिमशक्ती पक्षाकडून प्रशांत इंगोले यांनी आणला होता. आज तो प्रकल्प कुठे आहे याचा ठाव ठिकाणा तर सोडाच. पण तो प्रकल्प सुरू झाला तेंव्हा आम्ही सुरूवातीला त्या प्रकल्पामध्ये आपले पारिश्रमीक योगदान दिले असे म्हणणारा एक माणुस सुध्दा आम्हाला भेटला नाही असो काय झाले त्या पाच कोटीचे हा आणणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा विषय आहे.
सोबतच 2017 मध्ये प्रशांत इंगोले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून नांदेड महानगरपालिकेत आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिली होती. पण त्यांचाही विजय झाला नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितचे मुकूंद चावरे यांना 26 हजार मतदान मिळाले होते. आता त्यापेक्षा काकणभर सरसर असलेला उमेदवार हवा होता. ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश आले नाही अशा उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने दिलेली उमेदवारी कोणाच्या फायद्याची ठरणार आहे हे भविष्यातला काळ दाखवेल.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रा.यशपाल भिंगे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती. त्यांना 1 लाख 76 हजार मतदान मिळाले होते. तर 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत ऍड.अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 92 हजार मतदान मिळाले होते. तरी पण लोकसभा पोट निवडणुकीत उमेदवार न बदलता ऍड.अविनाश भोसीकर यांना वंचित बहुजन आघाडीने दिलेली उमेदवारी योग्य आहे असे म्हणता येणार नाही असो शेवटी विविध राजकीय पक्षांच्या विविध खेळी असतात आणि त्या खेळींमध्ये लोकांच्या ताज्या मुद्दाला हात घालून मतदान बदलून घेण्याची ताकत त्या खेळीमध्ये आसयला पाहिजे तरच उमेदवार निवडूण येतो आणि पक्षाची शान वाढत असते. या निवडणुकीमध्ये काय होईल हे 23 नोव्हेंबर रोजी कळेल आणि त्यावेळी बरेच काही लपलेले डाव उघडकीस येतील. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल.
-कंथक सुर्यतळ