नांदेड(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.9 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी येणार असून त्यांची सभा कौठा परिसरातील मोदी ग्राऊंड येथे पार पडणार असल्याची माहिती खा.अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत खा.डॉ.अजित गोपछडे, लोकसभा उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख, राष्ट्रवादी कॉंगे्रस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे,जिल्हा प्रवक्ता चैतन्य बापू देशमुख, दिलीप ठाकूर, बाळु खोमणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी खा. चव्हाण पत्रकारांना बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा नांदेडला येत आहेत. नांदेडला येणे म्हणजे निश्चितच मराठवाड्यातील विकासातील कामांना चालना मिळणे किंवा मराठवाड्यातील कामांची ही काही अपेक्षा आहे त्या कामांबाबत चर्चा होते आणि यातून सकारात्मक मार्ग समोर निघत असतो. सध्या लोक महायुतीला मतदान करण्याच्या सकारात्मक भुमिकेत आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनाने अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आणि त्याची अंमलबजावणीही मोठ्या प्रमाणात झाली. विशेषत: यात लाडकी बहिण ही योजना राज्यात कमी कालावधीमध्ये जास्त लोकप्रिय ठरली आहे. असेही खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचबरोबर दि.9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीचे महायुती पक्षातील भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ.संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन कौठा परिसरातील आयुक्त कार्यालयाच्या नियोजित जागेवर दुपारी 1 वाजेच्यासुमारास पार पडणार आहे. या ठिकाणी बाहेरगावहुन येणाऱ्या लोकांसाठी व वाहनांच्या पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे. तसेच लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागाही उपलब्ध आहे व शहराच्या बाहेर असल्यामुळे कोणताही अडथळा सर्वसामान्य लोकांना येणार नाही आणि चौथ्यांदा याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत असल्याने हा एक मनस्वी आनंद आहे असेही खा.अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.