नांदेड(प्रतिनिधी)-काल सकाळी भोकर जवळील बोरगाव शिवारात एका विहिरीतून प्रेत सापडले होते. या घटनेमागे बोरगाव येथे 2 नोव्हेंबर रोजी टाकलेल्या जुगार अड्ड्याच्या छाप्याचा संबंध असल्याची चर्चा आता भोकरमधील जनता उगीचच करत आहे आणि पोलीसांच्या अभिलेखावर आक्षेप घेत आहे.
काल दि.3 नोव्हेंबर रोजी पोलीस विभागाने जारी केलेले प्रेसनोटनुसार भोकरचे पोलीस निरिक्षक अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरिक्षक औटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक भोगुले, पोलीस अंमलदार गुंडेवार व जाधव यांनी बोरगाव शिवारात सायंकाळी 7.15 वाजता मुर्तुजा अली यांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी पोलीसांनी दोन जणांना पकडले. इतर आठ ते दहा जण पळून गेले असे प्रेसनोटमध्ये नमुद आहे. या जुगार छाप्यामध्ये 1250 रुपये रोख रक्कम, 7 दुचाकी गाड्या, 1 चार चाकी गाडी असा 9 लाख 61 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नामदेव कोटु जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुर्तुजा अली यांच्या टिनपत्रामध्ये सापडलेले सुनिल विनोद रिंगनमोडे(23) रा.बोळसाा ता.उमरी आणि मयुर सदाशिव गायकवाड(28) रा.भोकर यांच्यासह पळून गेलेल्या 8 ते 10 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 424/2024 महाराष्ट्र जुगार कायदा कलमानुसार दाखल करण्यात आला. पळून जाणाऱ्या आठ ते दहा पैकी बऱ्याच जणांनी आपली वाहने तेथेच सोडून पळून गेले. त्यांचाही शोध घेणे सुरू आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, भोकरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफकत आमना यांनी भोकर पोलीसांचे कौतुक केले आहे.
काल दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड येथील गोदावरी जिवरक्षक दलाने भोकर जवळच्या बोरगाव शिवारात मुर्तुजा अली यांच्या शेतातील विहिरीतून सतिश गिरी या व्यक्तीचा मृतदेह बोहर काढला. त्या संदर्भाने सतिश गिरीच्या पत्नीच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यू क्रमांक 61/2024 दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेत सतिश गिरी मुर्तूजा अली यांच्या विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असतांना तो विहिरीत पडला आणि मरण पावला असे लिहिले आहे. या ए.डी.मध्ये घटनेची वेळ 2 नोव्हेंबर 2024 च्या सायंकाळी 6 ते 3 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंतची लिहिली आहे. मुर्तूजा अली यांच्या शेतात छापा 2 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7.15 वाजता टाकलेला आहे. असा अभिलेख आहे. म्हणजे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याच्या 45 मिनिट अगोदरपासूनच सतिश गिरी त्या विहिरत पडला असे अभिलेख सांगते. असे असतांना भोकर येथील जनतेतील लोक असे सांगत आहेत की, सतिश गिरी सुध्दा पोलीसांनी छापा टाकला तेंव्हा तेथेच होता. तो पोलीसांना पाहुन पळाला आणि विहिरीत पडला आणि मरण पावला.
अभिलेखामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. तरी पण जनता उगीचच पोलीसांच्या कामांवर शंका घेत राहते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तर भोकर पोलीसांचे कौतुक केले आहे. मग कोण सिध्द करून दाखवणार की, सतिश गिरी हा पोलीस आल्यानंतरच पळाला. अशा व्यर्थ चर्चा करून जनता ज्यातून काहीच योग्य निर्णय बाहेर येणार नाही असे बोलत असते. काय म्हणावे अशा बोलण्याला.