नांदेड(प्रतिनिधी)-3 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे भेट देण्यासाठी आलेले तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्याविरुध्द दाखल झालेला ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा पोलीसांनी निकाली काढतांना या प्रकरणाला अ या सदरात समरी करून न्यायालयात पाठवून दिले आहे. या प्रसंगी डॉक्टरांविरुध्द दाखल झालेला गुन्हा आता त्याच मार्गावर पुढे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये नांदेडच्या शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी 36 तासामध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये घाणीचे साम्राज्य, औषधांची कमतरता, खाजगी औषध विक्रेत्यांची माफियागिरी, रुग्णालयात असलेली मनुष्यबळाची कमतरता अशी अनेक कारणे त्यासाठी तयारी होती. याबाबत 3 ऑक्टोबर रोजी माजी खासदार हेमंत पाटील हे रुग्णालयात भेट देण्यासाठी आले आणि तेथील अधिष्ठाता डॉ.शामराव रामजी वाकोडे (51) यांना बळजबरीने शौचालय साफ करायला लावले . त्यावेळी तेथील काही कामगार मंडळी अधिष्ठाता साफसफाई करीत आहेत हे पाहुन त्यांनी स्वत: आम्ही करतो असे म्हटल्यावर हेमंत पाटील यांनी त्यांना ते काम करू दिले नाही आणि तुमचा साहेब फुकट पगार घेतो का असे बोलत या सर्व घटनेचे चलचित्रीकरण आणि छायाचित्रीकरण करायला लावले. काही तासातच हे चलचित्रीकरण आणि छायाचित्रकरण विविध समाज माध्यमांवर व्हायरल झाले.
त्याच दिवशी नांदेड येथे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ हे आले होते. त्यांनी सुध्दा 30 लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तीला सोडले जाणार नाही असे वक्तव्य केले. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिष्ठाता डॉ.शाम रामजी वाकोडे यांनी काहीशी उशीरा तक्रार देतांना उशीर का झाला हे सुध्दा त्या तक्रारीत स्पष्ट केले होते. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 506, 500 आणि 34 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(1) (आर), 3(1)(एस), 3(1)(एम), 3(1)(यु), 3(2)(व्ही.ए.) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा सुविधा(हिंसक कृत्य व मालमत्तेची हाणी किंवा नुुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 च्या कलम 4 नुसार गुन्हा क्रमांक 703/2023 हेमंत पाटीलसह इतरांवर दाखल केला.
या तक्रारीविरुध्द अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे आणि इतर डॉक्टरांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार गुन्हा क्रमांक 705/2023 दाखल करण्यात आला. या तक्रारीत रुग्णालयात घडलेल्या 30 जणांच्या मृत्यूबद्दल डॉक्टर जबाबदार आहेत असा आशय या तक्रारीत होता. डॉक्टारांविरुध्दची तक्रार पोलीस थेट दाखल करत नसतात ती वैद्यकीय समितीकडे पाठवितात. त्या वैद्यकीय समितीने सुध्दा त्या 30 जणांच्या मृत्यूमध्ये डॉक्टरांची काही चुक नाही असा अहवाल पोलीसांना पाठविला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
डॉ.शाम वाकोडे यांनी दिलेल्या तक्रारीचा गुन्हा क्रमांक 703/2023 मध्ये पोलीसांनी केलेल्या तपासात काय-काय झाले याची सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही. परंतू पोलीसांनी याबाबत नांदेडच्या जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालयास मत विचारले असतांना त्यांनी या प्रकरणात अ समरी करण्याची सुचना केली होती अशी खात्रीलायक माहिती आणि त्याच आधारावर पोलीसांनी हा ऍट्रॉसिटीचा गुन्हा अ समरी वर्ग केला आहे आणि अंतिम अहवाल न्यायालयात पाठविला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 173 प्रमाणे पोलीसांना दाखल झालेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र पाठवावे अथवा अ-ब-क-ड या स्वरुपांमध्ये समरी अहवाल पाठवावा असे अधिकार आहेत.कायदे तज्ञांनी सांगितले की, अ समरी वर्ग करतांना त्यात तक्रारीप्रमाणे पुरावा भेटला नसेल किंवा त्या प्रकरणातील आरोपीच मिळाला नसेल तर अ समरी वर्ग केले जाते. या प्रकरणात चलचित्रीकरण आणि छाया चित्रीकरण व्हायरल झालेले होते. अनेक संघटनांनी याबद्दल आवाज उठविला होता. ऍट्रॉसिटीचा गुन्हा सुध्दा खोटा आहे असाही मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर मात्र दोन-तीन महिन्यातच हा अ समरी अहवाल पाठविला गेला. त्याची माहिती आता उघडकीस आली आहे.