पोलीस हुतात्मा दिनी मान्यवरांनी केले शहीदांना अभिवादन

निवडणुकीची जबाबदारी पोलीस विभागावर जास्त आहे-अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस दलाची जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने जनतेला निर्भयपणे मतदान करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.

आज पोलीस स्मृतीदिन समारंभात अबिनाशकुमार बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, डॅनियल बेन, सुशिलकुमार नायक आदींसह पोलीस दलातील अनेक पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, पोलीस जवान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व प्रथम यावर्षी हुतात्मा झालेल्या 214 पोलीसांची नावे पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप आणि सुशिलकुमार नायक यांनी वाचली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र वाहुन मानवंदना दिली. राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलीसांनी बंदुकीतील गोळ्या झाडून हुतात्मांना अभिवादन केले .

याप्रसंगी बोलतांना अबिनाशकुमार म्हणाले की, 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांसोबत लढतांना 10 भारतीय जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती. तेंव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन, पोलीस हुतात्मा दिन म्हणून आम्ही पाळतो आणि देशभरातील शहीद जवांनाना श्रध्दांजली अर्पण करतो. यंदाच्या वर्षी 214 जवान आपली सेवा बजावतांना शहीद झाले आहेत. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच पोलीस स्मृती स्मारक तयार करण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी सर्वांनी जायला हवे.
नांदेड जिल्ह्यात काम करतांना पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात मी आणि माझे जिल्हा पोलीस दल उत्कृष्ट काम करून खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करेल. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे. शब्दांमुळेच होतात वाद आणि शब्दांमुळेच मिटतात वाद. अशा परिस्थितीत शब्दांना दात नसतात पण त्यांचा आघात हा जास्त होतो. त्यामुळे पोलीस दलाच्यावतीने कोणालाही शब्दांनी घात करू नका आणि कोणी आपल्यावर शब्दांचा प्रहार करत असेल तर त्यासाठी आम्ही सर्व एकत्रीतपणे त्याला कायदेशीर उत्तर देवू आमच्या या एकजुटीनेच आम्ही जनतेला ही शाश्वती देवू शकतो की, निवडणुकांमध्ये जनता निर्भयपणे मतदान करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!