नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यांमध्ये अवैध दारु गाळपावर कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारु गाळप या अवैध प्रकारावर नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमधे एकूण 212 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 220 आरोपी आहेत आणि 8 लाख 58 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, आप-आपल्या घराजवळ, गल्लीत, गावात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती संबंधीत पोलीसांना द्यावी.
नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या चार जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, श्रीकृष्ण कोकाटे, सोमय मुंडे आणि रविंद्रसिंह परदेशी यांच्या देखरेखीत पोलीस दलाने अवैध दारु गाळप करणाऱ्यांवर कार्यवाही केली. नांदेड जिल्ह्यात 57 गुन्हे दाखल करण्यात आले. 58 आरोपी आहेत. 1 लाख 38 हजार 45 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यासाठी 50 पोलीस अधिकारी आणि 160 पोलीस अंमलदार एवढे मनुष्यबळ काम करत होते. परभणी जिल्ह्यात 48 गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींची संख्या 49 आहे. जप्त केलेला मुद्देमाल 2 लाख 3 हजार 500 रुपयांचा आहे. या कार्यवाहीसाठी एकूण 53 अधिकारी आणि 126 पोलीस अंमलदार झटत होते. हिंगोली जिल्ह्यात 21 गुन्हे दाखल करण्यात आले त्यात 26 आरोपी आहेत. एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 1 लाख 40 हजार 616 रुपयांचा आहे. यासाठी 37 पोलीस अधिकारी आणि 120 पोलीस अंमलदारांनी मेहनत घेतली. लातुर जिल्ह्यात 46 गुन्हे दाखल करण्यात आले त्यात 87 आरोपी आहेत. एकूण 3 लाख 76 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यासाठी 28 अधिकारी आणि 140 पोलीस अंमलदार यांनी मेहनत घेतली. चार जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 212 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 220 आरोपी आहेत. जप्त केलेली हातभट्टी दारु 1978 लिटर आहे. दारुचे रसायन 4993 लिटर आहे. देशी दारु 2922 बॉटल आहेत. विदेशी दारु 46 बॉटल आहेत असा एकूण 8 लाख 58 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. या कार्यवाहीसाठी एकूण चार जिल्ह्यांमध्ये 168 अधिकारी आणि 546 पोलीस अंमलदार यांनी भरपूर मेहनत घेतली.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आप-आपल्या घराजवळ, गल्लीत, गावात, चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत माहिती द्यावी. जेणे करून अवैध काम करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!