नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागाने अग्रीम आरक्षण करण्याच्या सेवेमध्ये मोठा बदल केला असून आपल्या प्रवासाच्या 60 दिवसांअगोदर हे आरक्षण करता येईल.
रेल्वे बोर्डाचे संजय मनोचा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रानुसार रेल्वे प्रवाशांना मिळणारी रेल्वेतील अग्रीम आरक्षणाची सेवा यापुर्वी 120 दिवसांअगोदर करता येत होती. पण आता त्यात बदल करण्यात आला असून ही अग्रीम आरक्षणाची सेवा आपल्या प्रवासाच्या तारखेला वगळून 60 दिवसांअगोदर करता येणार आहे. अग्रीम आरक्षणाच्या सेवेत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केलेली सर्व अग्रीम आरक्षणे कायम राहतील. नवीन बदलाचा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून अंमलात येईल. 120 दिवसांच्या आरक्षण पध्दतीत अग्रीम केलेली आरक्षणे रद्द सुध्दा करता येतील. ताज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस अशा काही दिवस चालणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होणार नाही. विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांअगोदर अग्रीम आरक्षण करण्याची पध्दत बदलण्यात आलेली नाही. रेल्वे प्रवास नियोजित करणाऱ्या प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.