नांदेड(प्रतिनिधी)-मागे पडलेली महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्याच्या निवड णुकांची आज घोषणा झाली. नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभेच्या 9 मतदार संघात एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे याची माहिती नांदेडचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व निवडणुक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 पुर्वी पुर्ण करायची आहे.
नांदेडचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
या निवडणुकांबद्दल माहिती सांगतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, या निवडणुकीच्या राजपत्रात प्रसारणाचा दिवस 18 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनाची तपासणी करण्याचा दिवस 28 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशन परत घेण्याचा दिवस 30 ऑक्टोबर रोजी आहे आणि नांदेड लोकसभा निवडणुक आणि नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणुक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 रोजी पुर्ण केली जाणार आहे.
16 नांदेड लोकसभा पोट निवडणुक आणि नांदेड जिल्ह्यातील विधानसभा क्रमांक 86, 84, 85, 86, 87, 88, 89, 90 आणि 91 या नऊ मतदार संघामध्ये एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभांमध्ये एकूण 1283 मतदान केंद्र आहेत. नऊ ठिकाणी 100 टक्के महिला अधिकारी असलेली मतदान केंद्र आहेत, नऊ ठिकाणी दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र आहेत. नऊ केंद्रांवर 100 टक्के अधिकारी युवा आहेत. किनवट विधान सभेतील पांगरपहाड, हदगाव विधानसभेतील चौरंबा, भोकर विधानसभेतील पाकी तांडा, देगलूर विधानसभेतील रामतिर्थ आणि मुखेड विधानसभेतील कोळेगाव अशी 5 मतदान केंद्रे संवेदनशिल आहेत.
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सावलीची सोय करण्यात आलेली आहे. रांगविरहित मतदानाची सोय आहे.व्हिलचेअरची सोय करण्यात आली आहे. हिरकनी कक्ष आणि पाळणाघर सुध्दा तयार करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिका उपलब्ध असेल.
विधानसभा निवडणुकीसाठी नऊ मतदार संघातील 3088 मतदान केंद्रांकरीता बीयु-7010, सीयु-3922, व्हीव्हीपीएटी-4231 उपलब्ध आहेत. 16 लोकसभानिवडणुकीसाठी 2082 मतदान केंद्राकरीता बीयु-4164, सीयु-4164, व्हीव्हीपीएटी-4164 उपलब्ध आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.22 फाईंग स्कॉड तयार आहेत. 25 एसएसटी उपलब्ध आहेत. सेक्टर ऑफिसर-296 आणि 54 राखीव आहेत. निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने पोलीस सेक्टर ऑफीसर म्हणून 296 जणांची नियुक्ती केली आणि 54 राखीव आहेत. 1546 मतदान केंद्रावर वेबकास्टींग होणार आहे. निवडणुकीच्या 48 तासात बल्क एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे.
83 किनवट विधानसभा मतदार संघात एकूण 277158 एवढे मतदार आहेत. त्यात तृतीयपंथी 11 आहेत. सैनिक मतदार 138 आहेत. 84 हदगाव विधानसभा मतदार संघात एकूण मतदान 297315 आहे. त्यातील 4 तृतीयपंथी आहेत. 166 सैनिक मतदार आहेत. 85 भोकर मतदार संघात 301172 एकूण मतदार आहेत. त्यात 11 तृतीयपंथी आहेत. सैनिक मतदार 249 आहेत. 86 नांदेड उत्तर मतदार संघात 356453 असे एकूण मतदार आहेत. त्यात 103 तृतीयपंथी आहेत आणि 154 सैनिक मतदार आहेत. 87 नांदेड दक्षीण विधान सभा मतदार संघात 315248 एकूण मतदार आहेत त्यात 5 तृतीयपंथी आहेत. 231 सैनिक आहेत. 88 लोहा मतदार संघात 30031 असे एकूण मतदार आहेत त्यात 5 तृतीयपंथी आहेत आणि 930 सैनिक मतदार आहेत. 89 नायगाव विधानसभा मतदार संघात एकूण मतदार 308828 आहेत. त्यात 10 तृतीयपंथी आहेत 234 सैनिक आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव 90 देगलूर विधानसभा मतदार संघात 310603 असे एकूण मतदार आहेत त्यात 17 तृतीयपंथी आहेत आणि 188 सैनिक आहेत. 91 मुखेड मतदार संघात 304546 असे एकूण मतदार आहेत त्यात 8 तृतीयपंथी आहेत आणि सैनिक 621 आहेत. नऊ विधानसभा मतदार संघात पुरूष मतदार 1422809, महिला मतदार 1348470, तृतीयपंथी मतदार 174 एकूण मतदार 2771453 आणि सैनिक मतदार 2911 आहेत.
यंदाच्या निवडणुकीमध्ये 68799 युवा मतदार आहेत.85 पेक्षा जास्त वय असलेले मतदार 35793 आहेत. दिव्यांग मतदार 23047 आहेत. यामध्ये 85 पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सोय करण्यात आली आहे. एकूण मतदान केंद्रांची संख्या 3088 आहे. मतदान केंद्रावर काम करणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांची संख्या 21516 आहे. ज्यामध्ये पुरूष अधिकारी 15883 आहेत. महिला अधिकारी 5633 आहेत.
नांदेड लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रीत होत असल्याने मतदान केंद्रावर दोन मतदान कक्ष असतील. पांढऱ्या रंगाची मतदान पत्रिका लागलेली मशीन लोकसभेसाठी असेल आणि गुलाबी रंगाची मतपत्रिका लागलेली मशीन विधानसभेसाठी असेल. दोन मतदान केंद्रांच्या मध्ये दोन मतदान अधिकारी बसलेले असतील. पहिला अधिकारी लोकसभा निवडणुकीचे बटन ऑन करेल त्यानंतर मतदारांनी तेथे मतदान करायचे. पुढे दुसरा मतदान अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या मशिनचे बटन ऑन करेल तेंव्हा मतदारांनी विधानसभेच्या मतदान केंद्रात मतदान करून मतदान केंद्राबाहेर प्रस्थान करायचे आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारांसाइी मार्गदर्शक व्यक्ती असेल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.