नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पडीत जागेत बसलेल्या तीन चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी गाड्या, 6 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेला जिल्हा परिषद प्रांगणातील पडक्या जागेत पाठविले. पोलीस पथकाने तेथून म्हाळसाकांत उर्फ गगन मारोती उराडे (24) रा.कोटतिर्थ ता.जि.नांदेड, निजाम नुरशाह फकीर (24) रा.उस्माननगर ता.कंधार जि.नांदेड, स्वराज उर्फ माधव एकनाथ मोरे (26) रा.पिंपळगाव कोरका ता.जि.नांदेड या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून कागदपत्र नसलेल्या चोरीच्या 14 दुचाकी सापडल्या. वेगवेगळ्या 14 ठिकाणावरून त्यांनी या दुचाकी गाड्या चोरल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यात उदगीर-1, पुणे-1, नांदेड शहरातील विविध ठिाकणी-12 अशा 14 दुचाकी गाड्या त्यांनी चोरल्या होत्या. त्यांच्याकडे सापडलेल्या दुचाकींमुळे वजिराबाद पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे 6 गुन्हे, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे, नांदेड ग्रामीण हद्दीतील दोन गुन्हे, लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या सर्व दुचाकी गाड्यांची किंमत 6 लाख 40 हजार रुपये आहे.
या संदर्भाने स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या आरोपींना गुन्हा क्रमांक 5/2024 साठी वजिराबाद पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी या कार्यवाहीसाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सायबरचे पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, तिरुपती तेलंग, संदीप घोगरे, बालाजी कदम, राजू डोंगरे, अमोल घेवारे, सुधाकर देवकत्ते आणि सायबर विभागातील राजेंद्र सिटीकर आणि व्यंकटेश सांगळे यांचे कौतुक केले आहे.