नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत एका 21 वर्षीय युवकाकडून एक पिस्टल आणि एक जीवंत काडतुस जप्त केले आहे.
दि.10 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने प्रतिभानिकेत महाविद्यालयासमोर कुलज्योतसिंघ रविंद्रसिंघ मेलजोलवाले (21) या युवकाला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्या ताब्यात एक अग्नीशस्त्र आणि एक जीवंत काडतुस असा 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस अंमलदार अनिल मुरलीधर बिरादार यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात कुलज्योतसिंघ विरुध्द भारतीय हत्यार कायद्यातील कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 498/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी पिस्टल पकडण्याची कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, राजू बोधगिरे, अनिल बिरादार, साहेबराव कदम, शेख इसराईल, अकबर पठाण, मोतीराम पवार यांचे कौतुक केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार पोलीस अंमलदार अनिल बिरादार बकल नंबर 1041 यांची नियुक्ती दहशतवाद विरोधी पथकात असतांना मी मागील एक वर्षापासून नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत नेमणुकीस आहे असे लिहिले आहे. स्थानिक गुन्हा शाखेत नेमणुक नसतांना सुध्दा अनिल बिरादारने दिलेली तक्रार बनावट पणा आहे असे लिहिले तर काय चुकणार आहे. सोबतच रिंदा पथकात(खंडणी विरोधी पथकात) येथे नियुक्तीस असलेल्या तानाजी येळगे बकल नंबर 1601 हा पोलीस अंमलदार सुध्दा माझ्या सोबत होता असे या तक्रारीत लिहिलेले आहे. अशी तक्रार देता येते काय? हा बनावट पणा नाही काय? कोण या बनावट पणाला पाठबळ देतो? आणि असेच काम पोलीस खात्यात चालत असते काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.
या प्रकरणात फायनान्स करणाऱ्या व्यक्तीचा संबंध असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका युवकाच्या मोबाईलमध्ये बंदुकीचा फोटो होता. त्याला सुध्दा आणले होते. पण फायनान्सच्या मालकाला 4000 मोदकांचा प्रसाद लावल्यानंतर सोडून देण्यात आले होते अशी सुध्दा माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.