नांदेड – छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील बौद्ध लेणी परिसरातील विहाराच्या बांधकामास अतिक्रमित ठरविणारी सुप्रीम कोर्टाची नोटीस तत्काळ रद्द करून बांधकाम नियमित करावे. येथील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विहारास तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 11 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे बौद्ध लेणी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक तथा जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बौद्ध लेणी या ऐतिहासिक आहेत. भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे त्या प्रतीक आहेत .अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक बौद्ध लेणीचे महत्व कमी करण्याच्या कुटील बुद्धिमत्तेतून या लेणींना बाधित करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील बौद्ध लेणी परिसरातील विहाराच्या बांधकामास अतिक्रमित ठरविणारी सुप्रीम कोर्टाची नोटीस ही जाणीवपूर्वक आणि धर्मांध शक्ती कडून देण्यात आलेली आहे . त्यामुळे सादर नोटीस रद्द करावी आणि बांधकाम नियमित करावे . या परिसरातील बौध्द लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विहारासही तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा सर्वांगीण विकास करावा या मागणीसाठी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता नांदेड शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध लेणी बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात बौद्ध अनुयायांनी मोठ्या सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.सोनसळे यांनी केले आहे.