नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्डाद्वारे संचलित सचखंड पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अनिल कौर खालसा यांनी शासन किंवा प्रशासकाची कोणतीही परवानगी न घेता शाळेचा गणवेश बदलून पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पालकांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी व आरोप: मुख्य तक्रारदार स. जगदीप सिंघ नंबरदार व इतर पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिकेने कोणताही कार्यालयीन आदेश नसताना जुना गणवेश रद्द करून २ ते ३ प्रकारचे नवीन ड्रेस घेण्याची सक्ती केली आहे. हे सर्व ड्रेस मुख्याध्यापिकेच्या निकटवर्तीय एकाच विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची जबरदस्ती पालकांवर केली जात आहे.

गोरगरीब पालकांवर आर्थिक ताण: ही शाळा मूळतः रोजंदारी कामगार, ऑटो चालक, तसेच फळ व भाजी विक्रेते यांसारख्या गरजू घटकांतील मुलांना कमी शुल्कात शिक्षण मिळावे या हेतूने सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानक लादलेल्या गणवेश बदलामुळे गरीब कुटुंबांवर हजारो रुपयांचा नाहक बोजा पडत असून, पालकांचा शालेय व्यवस्थापनावरील विश्वास उडाला आहे.

माहिती दडपण्याचा आरोप व कारवाईचा अभाव: शिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय गणवेशात बदल करता येत नाही, तरीही नियम धाब्यावर बसवून हा निर्णय लादण्यात आला. यासंदर्भात ६ ऑगस्ट २०२६ रोजी माहिती अधिकाराखाली अर्ज केला असता, माहिती न देता आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यापूर्वीही समाजसेवकांनी अनिल खालसा यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या, परंतु गुरुद्वारा प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही.

पालकांच्या मुख्य मागण्या: 

१. अधिकृत चौकशी: शाळेने गणवेश बदलाची रीतसर परवानगी घेतली आहे का, याची तात्काळ चौकशी व्हावी. 

२. दंडात्मक कारवाई व परतावा: परवानगीशिवाय बदल केला असल्यास मुख्याध्यापिकेवर दंडात्मक कारवाई करून, पालकांकडून उकळलेले अतिरिक्त पैसे मुख्याध्यापिकेच्या पगारातून वसूल करून पालकांना परत दिले जावेत.

तक्रारदार व निवेदनाच्या प्रती: या तक्रार अर्जावर स. जगदीपसिंघ नंबरदार यांच्यासह गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सदस्य राजेंद्र सिंग पुजारी, मनबीर सिंघ ग्रंथी, मनिंदर सिंघ राज रामगडया, बक्षी सिंघ पुजारी, गुरुबचन सिंघ कारागीर, प्रेमजीत सिंघ शिलेदार, विजेंदर सिंघ बिट्टू शर्मा, अवतार सिंघ, जितेंद्र सिंग ठाकूर आणि कमलजीत सिंघ रागी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तक्रारीच्या प्रती नांदेड जिल्हाधिकारी, गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आल्या असून, आता शिक्षण विभाग यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!