सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा

नांदेड :-सफाई कामगारांसंदर्भात असणारे कायदे, त्यांच्या सुविधा, शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश यांचे काटेकोर पालन नांदेड महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाले पाहिजे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना संबधित कायद्याचे पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांनी आज येथे केले.

 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेतील व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या सदस्यांनी घेतला.

या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर ईरलोड, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शहर अभियंता सुमंत पाटील तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

सर्वप्रथम राष्ट्रीय कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांचे व त्यांच्या सहकारी वर्गाचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस मनपाचे उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकूण ०६ झोन असून त्यातील २० प्रभागामध्ये संपूर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकूण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५३१ कायम कामगार कार्यरत आहेत. तर २७४ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ४०६ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात. तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासून सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात मागील दोन वर्षाच्या कालावधीत्त एकूण ५५ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उपआयुक्तांनी सांगितले.

 

महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामागाराना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबूट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमशुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सफाई आयोगाच्या सदस्यांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात आहे. तसेच ईपीएफ व इएसआयसी, ५ टक्के घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम-साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी मनपाच्यावतीने सांगण्यात आले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी यावेळी कामगार नेत्यांनाही आपली भुमिका मांडण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच सफाई कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापण करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनपा आयुक्तांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या कामावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली. बैठक संपल्यानंतर आयोगाच्या सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सुद्धा भेट दिली. या बैठकीचे सुत्रसंचालन मनपाच्या जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!