नांदेड (प्रतिनिधी)-प्रविण पाटील चिखलीकरचे नाव नंबर 1 आरोपी असे लिहिले आहे असे समजून सांगून नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत बेमालूमपणे ते वगळले आहे. जखमी अवस्थेतील संतोष सांगत होते की, पत्रकार बालाजी वैजाळेमुळे मला धोका झाला आहे.
जखमी अवस्थेत असलेल्या कापसी येथे संतोष एकनाथ वडवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 सप्टेंबर रोजी मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात सोंगाड्या नावाची पोस्ट केली होती. मी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्यासुमारास मी माझ्यासोबत पत्रकार बालाजी वैजाळे असे त्याच्या गाडीवर बसून कापसीकडे जात असतांना बालाजीच्या मोबाईलवर गणेश उबाळेचा फोन आला आणि मला फेसबुक पोस्टबद्दल बोलायचे आहे असे म्हणाला. आम्हाला भायगाव पाटीजवळ एस.पी.पेट्रोल पंपावर बोलावले. तेथे एका काळ्या स्कॉरपीओ गाडीमध्ये बरेच लोक हजर होते. त्यांनी मला पकडून माझ्या डोळ्यावर दस्ती बांधून मारहाण करत गाडीत टाकले. प्रताप पाटील यांच्याविरोधात पोस्ट टाकायची तुझी लायकी आहे काय? असे सांगत मारहाण करण्यास सुरूवात केली. मी हात जोडून माफी मागत होतो. त्यावेळी प्रविण पाटील यांचा आवाज आहे असे वाटले आणि त्यांनी मला पुन्हा गाडीत बसवले. माझ्या हातातील 9 ग्रॅम सोन्याची अंगठी, 5 ग्रॅम सोन्याची चैन आणि पॅन्टच्या डाव्या खिशातील 25 हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. मला नंतर गाडीमधून खाली उतरविले ते पांढऱ्या रंगाचे फार्म हाऊस होते.तेथे मला स्टिक, गाठी, तलवारीच्या सहाय्याने गणेश उबाळेने भरपूर मारहाण केली. मला मारहाण करणाऱ्या इतर लोकांमध्ये राहुल तारु, सतिश शिवाजी मोरे, संजय टाकळीकर(याचे नाव वेगळे आहे पण पोलीसांनी संजय लिहिले आहे असे संतोष वडवळे सांगत होते), बालाजी जाधव आणि इतर 10 लोक ज्यांची नावे माहित नाही असे लोक मला मारहाण करत होते असे तक्रारीत लिहिले आहे.
हा प्रकार घडल्याचा वेळ 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत असा एफआयआरमध्ये लिहिला आहे. पोलीसांना याबद्दलची माहिती 2 ऑक्टोबरला रात्री 11.34 वाजता मिळाली असे लिहिले आहे. प्रत्येक एफआयआरमध्ये क्रमांक 13 मध्ये प्रथम खबर तक्रारदाराला वाचून दाखवली. बरोबर नोंदवली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला खबरीची प्रत मोफत दिली असे लिहिले असते. यावर संतोषची स्वाक्षरी आहे आणि हा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे या आहेत.
आज 3 ऑक्टोबर रोजी संतोष वडवळे यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी सांगितले की, संतोष वडवळे हे थोडक्यात वाचलेले आहेत. सोबतच संतोष वडवळे सांगत होते की, पोलीसांनी मला सांगितले की, आरोपी क्रमांक 1 वर प्रविण पाटील चिखलीकरचे नाव आहे. पण एफआयआरमध्ये तसे नसून या प्रकरणामध्ये सगळ्यात शेवटी लिहिले आहे की, प्रताप पाटील चिखलीकर व प्रविण पाटील चिखलीकर हे मुख्य सुत्रधार असल्याचा मला संशय आहे. सोबतच संतोषच्या आई सांगत होत्या. बालाजी वैजाळेनेच माझ्या मुलाचा घात केलेला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अपहरण, रस्ता रोखणे, दरोडा, धोका, गंभीर दुखपत, जिवघेण्याचा प्रयत्न, अपमान, नुकसान ही भारतीय न्याय संहितेतील कलमे आणि हत्यार कायद्यातील विविध कलमांसह 12 कलमांनुसार गुन्हा क्रमांक 888/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अनंत भंडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
संजय राऊत भेटीसाठी येणार
आज रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संतोष वडवळे यांच्यासोबत शिवसेना उध्दव गटाचे संजय राऊत यांनी संपर्क साधून संतोष वडवळेला सांगितले की, राजकीय जीवनात असे प्रकार होत असतात मी लवकरात लवकर तुम्हाला भेटायला येणार आहे. संतोष वडवळे यांनी सुध्दा आपल्या मनातील भावना संजय राऊत यांच्यासमोर व्यक्त करून आपल्यावर झालेला अन्याय सांगितला. याबद्दल माझे लोहा येथील नेते एकनाथ पवार यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचेही संजय राऊत यांनी संतोष वडवळे यांना सांगितले.