नांदेड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा मार्ग हा खऱ्या अर्थाने मानवाच्या शोषण मुक्तीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्य समाजाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य झिजवले आहे. ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी अंगीकारली, त्यांच्या कुळाचा उद्धार झाला आहे .त्यामुळे मातंग समाजालाही आता आंबेडकरवादा शिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे मातंग समाजाने आंबेडकरवाद स्वीकारून स्वतःच्या विकासाचा मार्ग स्वतः निवडावा असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे नेते प्रा. राजू सोनसळे यांनी व्यक्त केले .
रावण बाबा वाघमारे यांच्या स्मृती पित्यार्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेस आर जे वाघमारे, दलित मित्र माधवराव आंबटवाड, विलास गजभारे, एडवोकेट चंद्रप्रकाश सांगवीकर, इरवंत सूर्यकांत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर गणपतराव वाडेकर हे होते .
प्रास्ताविक प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले यांनी केले तर यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम गजले यांनी केले . आभार प्रदर्शन बा. रा. वाघमारे यांनी मांडले. या व्याख्यानमालेस पंचपुलाबाई भोसले, सविताबाई गायकवाड ,ज्योतीताई मोरे, मायाबाई आंबटवाड , यशोदा गालफाडे यांच्यासह पी. बी. कोलंबीकर , वाय.जी .वाघमारे, प्राध्यापक जी.एस. वाघमारे , प्राध्यापक आर .वाय .सावते , प्राध्यापक ब.ना. गोविंदवाड, तारू, एम.डी. सूर्यवंशी , नारायण कोलंबीकर यांची उपस्थिती होती. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी बबन बुचडे , संदीप गायकवाड , सूर्यकांत शिंदे, विनोद भोसले , पांडुरंग आंबटवाड , बालाजी पाटोळे आदींनी परिश्रम घेतले .
भिमवाडी येथील प्रकाश कांबळे हे दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम घेत असतात त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आजच्या सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास दररोज अभिवादन करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
व्याख्यानमालेत पुढे बोलताना प्राध्यापक राजू सोनसळे म्हणाले की , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत भारतातील अस्पृश्य जनतेचे प्रतिनिधित्व केले . 1931 मध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमाल परिषदेत अस्पृश्य म्हणून ठेवणारे ९ निकष आणि ११०८ अस्पृश्य जाती भारतात असल्याचे सांगितले होते मात्र या जातींना सामाजिक स्वातंत्र्य नसल्याचे मत त्यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पटलावर मांडले. बहिष्कृत वर्गाच्या प्रतिनिधित्वाची म्हणजेच आरक्षणाची मागणी मान्य करून घेतली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अस्पृश्य समाजाच्या उत्थानासाठी काम करत असताना या समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा राष्ट्रीय प्रमुख खिलारे नावाचा मातंग समाजाचा तरुण होता . रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर एन शिवराज हे देखील मातंग समाजाचे होते. त्यामुळे मातंग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून वेगळा नाही फक्त गरज आहे ती मातंग समाजातील सुशिक्षित पिढीने आता अधिकाधिक बाबासाहेब समजून घेण्याची , आणि समजून घेतलेल्या बाबासाहेबांची अमलबजावणी करण्याची .त्यानंतरच आपल्या कुळाचा , आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा उद्धार होईल . यासाठी मातंग समाजातील प्रत्येक तरुणाने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अंगीकारण्याची आणि समजून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्या दलित साहित्य संमेलनात , ‘जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव ‘ अशी उदघोषणा केली होती. फकीरा ही कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना समर्पित केली आहे. याचा अर्थ मातंग समाजाच्या सामाजिक प्रेरणा आणि जाणीव ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून येतात. त्या कायम वाढत राहाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.