नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेने एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडून गोवंश जातीचे बैल विक्री करून घेतलेली रोख रक्कम जप्त केली आहे. या चोरट्याने एकूण 13 जागी पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे सोबत पोलीस अंमलदार रवी बामणे, बालाजी यादगिरवाड, बालाजी तेलंग, सायबर सेलचे राजू सिटीकर आणि दीपक ओढणे यांना अब्दुल कलाम अब्दुल सत्तार (22) राहणार हिलाल नगर नांदेड देगलूर नाका यास ताब्यात घेण्यास सांगितले. त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सांगितले की पोलीस ठाणे मुदखेड हद्दीत 2, नायगाव हद्दीत 2,कुंटूर हद्दीत 2 भोकर हद्दीत 2, मुदखेड, बिलोली, देगलूर, लिंबगाव आणि मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 असे तेरा ठिकानाहून 2 लाख 13 हजार रुपये किमतीचे पशुधन चोरले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चोरट्याने विक्री केले होते, त्या लोकांकडून त्या पशुधनाची रोख किंमत जप्त केली आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.