नांदेड(प्रतिनिधी)-नेरली गावात पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी पिल्यामुळे शेकडो लोकांना विषबाधा झाली आहे. यामध्ये लहान बालके ते वयोवृध्द लोकांचा समावेश आहे. प्रशासनाने सुध्दा झालेल्या घटनेसंदर्भाने दखल घेतली असून आपल्यावतीने उपाय योजना केल्या आहेत.
नांदेडजवळच्या नेरली गावात शेकडो जणांना पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाली. काल रात्री काही जणांना उलट्या, जुलाब, चक्कर, मळमळ असे त्रास होवू लागल्याने एक-एक जण रुग्णा लयात दाखल होत होता. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहुन डॉक्टरांचे पथकच गावात पाठविण्यात आले. जवळपास सर्व लोकांची तपासणी झाली असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
नेरली गावात असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची साफसफाई बऱ्याच वर्षापासून झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला असावा अशी चर्चा आहे. गावातील पाण्याच्या टाकीतील पाणी दुषीत झाले असेल असे डॉक्टरांनी प्रसार माध्यमांना सांगितले. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत. सध्या त्या टाकीतून पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई केली जा णार आहे. शासनाने पाच वर्षापुर्वी गावासाठी वॉटर फिल्टरची योजना दिली होती. पण आजही हे वॉटर फिल्टर धुळखात पडलेले आहे. सन 2022 साली जलजीवन मिशनची योजना मंजुर झाली. मात्र योजनेचे काम झाले नाही फक्त गावात बोर्ड लावणयात आला असे उपसरपंचानी सांगितले. जल जीवन मिशन योजने अनेक पत्रकारांनी सुध्दा कामे घेतली होती. त्या कामांचे हाल पण बेहालच असल्याचे बरेच जण सांगतात.
आरोग्य पथकाने गावातील 256 रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी 99 रुग्णांना उच्च केंद्रात पाठविण्यात आले आहे. इतर सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माहितीवरून पाठविली आहे. अतिगरजेच्या वेळेसाठी नेरली गावात रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. पाच आरोग्य पथकांच्यावतीने घरोघरी सर्व्हेक्षण सुरू आहे.अशी माहिती देण्यात आली आहे.
नेरली गावात घडलेला हा प्रकार पाणी दुषीत असल्याने घडल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. नेरली गावाच नव्हे तर नांदेड शहर आणि जिल्ह्यात हजारोंनी पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या उभ्या आहेत. पण त्यांची कधी साफसफाई झाली काय? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. किंबहुना पाण्याची टाकी साफ केली जाते हे तर दक्षकांपासून दिसले नाही. नेरली गावात घडलेल्या या अतिसाराच्या प्रसंगानंतर जिल्हाभरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची त्वरीत प्रभावाने तपासणी करून त्यांची स्वच्छता सुध्दा त्वरीत व्हायला हवी. नाही तर नेरलीसारखी घटना दुसरीकडे घडणार नाही याची काही शाश्वती देता येत नाही. नेरलीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील टाक्यांची तपासणी आणि साफसफाई हा एक प्रश्न नाही तर पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची नियमित तपासणी आणि साफसफाई होणे आवश्यक आहे.