नांदेड:- जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी, कापूस इत्यादी प्रमुख पिके आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणे या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी गट/ महिला बचतगट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद कृषी विभाग उपकर योजनेच्या अर्थसाहयातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाची उभारणी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटांना उद्योग उभारणी करून गटाचे विस्तारीकरण करणे, बळकटीकरण करणे, रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे .
जिल्ह्यामध्ये दाल मिल उद्योग, ऑइल मिल, उद्योग, मसाला उद्योग, चिप्स उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग, प्राथमिक प्रक्रिया उद्योग इत्यादी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यातून पुढील बचतगटांची निवड झालेली आहे. या बचतगटांना जिल्हा परिषदेमार्फत पूर्व संमती देऊन उभारणी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे .सदर योजनेअंतर्गत शेतकरी गटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्या अनुषंगाने रक्कम रुपये 3 लाख किंवा 75 टक्के अनुदान मर्यादित अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये पुढील बचतगटांची निवड झालेली आहे .
माहेर स्वयंसहाय्यता समूह गट जैतापूर तालुका नांदेड सूक्ष्म प्रक्रिया – पापड मशीन ,नमकीन मशीन या उद्योगाची उभारणी करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी बचत गट पिंपळकोठा तालुका मुदखेड सूक्ष्म प्रक्रिया उद्योग,-दुग्धजन्य पदार्थ तयार करणे. कै. गिरीश भाऊ गोरठेकर पुरुष बचत गट गोरठा तालुका उमरी दाल – मिल प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.जेठालाल महाराज महिला सेंद्रिय शेतकरी बचत गट रूपा नाईक तांडा तालुका माहूर दाल मिल प्रक्रिया उद्योग. रानी झलकारी महिला बचत गट पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर- दाल मिल शेलार मशीन प्रक्रिया उद्योग. संत सावतामाळी महिला बचत गट काठेवाडी देगलूर – मसाले प्रक्रिया उद्योग कृषी उन्नती शेतकरी गट लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर – चिप्स उद्योग, ज्योतिर्लिंग फार्मर प्रोडूसर कंपनी सापती तालुका हदगाव – मल्टीग्रेन डीस्टोन मशीन प्रक्रिया उद्योग. ग्रीन ओझोन ऍग्रो प्रोडूसर कंपनी लोणावळा बुद्रुक तालुका मुखेड – तेल घाना भुईमूग फोडणी यंत्र प्रक्रिया उद्योग. शिवानी महिला स्वयंसहाय्यता बचत गट हिप्परगा तालुका कंधार – पॅकिंग मशीन मसाला मशीन प्रक्रिया उद्योग. अनुसया माता महिला बचत गट काजीपोड तालुका किनवट- दाल मिल प्रक्रिया उद्योग. साई समर्थ शेतकरी गट मांजरम तालुका नायगाव – दाल मिल प्रक्रिया उद्योग. जय भवानी महिला बचत गट चिंचाळा तालुका भोकर – दाल मिल प्रक्रिया उद्योग. धरणी शेतकरी उत्पादक गट जोमेगाव तालुका लोहा दाल मिल – ग्रेडिंग पॅकेज प्रक्रिया उद्योग. अमृतालयाम शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बेळकोणी तालुका बिलोली – सोलार ड्रायर प्रक्रिया उद्योग. धर्माबाद ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड समराळा तालुका धर्माबाद – सेंद्रिय दाल प्रतवारी पॅकिंग मशीन, ग्रेडिंग स्वच्छता मशीन. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात 16 सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.