नांदेड- जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या उपकर योजनेअंतर्गत शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारण्याची महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करण्याच्या उद्देशाने या उद्योगांची उभारणी केली जात आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सीईओ मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू केली गेली असून, रोजगार निर्मिती व शेतकरी गटांचे बळकटीकरण हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत. शेतकरी गटांना सूक्ष्म उद्योग उभारण्यासाठी ३ लाख रुपये किंवा ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या उपकर योजनेत ५० लाख रुपयांची तरतुद केली आहे.
नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी आणि कापूस यांसारख्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालावर आधारित उद्योग उभारले जातील. यात दाल मिल, ऑइल मिल, मसाले, चिप्स, दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्राथमिक प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील शेतकरी गटांची निवड करण्यात आली असून, या गटांना जिल्हा परिषदेकडून उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपक्रमात पन्नास लाखांची तरतुद केली आहे. यासाठी निवड झालेल्या गटांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी प्रकल्प उभारणीसाठी पूर्व संमती दिली आहे. प्रकल्प उभारणी केल्यानंतर त्याची पाहणी करुन दोन हप्त्यात अनुदान दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या ७५ टक्के किंवा ३ लाखापर्यंतचा निधी दिला जाईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच तालुकास्तरावर रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले.