नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस महासंचालकांनी केलेल्यानंतर सुध्दा काही तरी कारणे सांगून,बनावट प्रचार करून ते पोलीस अधिकारी आजही बदली झालेल्या ठिकाणी गेलेले नाहीत. याचे काय कारण असेल हे शोधण्यासाठी हे काम एखाद्या विद्यावाचस्पती विभुषीत व्यक्तीला द्यावे लागेल.
पाच महिन्यापुर्वी पोलीस महासंचालक कार्यालयाने येत्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर बऱ्याच पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या बदल्यानुसार नांदेड पोलीस परिक्षेत्रात सुध्दा बरेच पोलीस अधिकारी नवीन आले. नांदेडसह चारही जिल्ह्यातून बरेच अधिकारी झालेल्या बदली प्रमाणे नवीन ठिकाणी गेले पण. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांनी मला एक वर्षाची स्थगिती मिळाली, मी जाणार नाही, मला कोण पाठविल, मी पाहुन घेतो अशा शब्दांचा प्रचार करत ते आजही नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर येथे तळ ठोकून आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर तरी ते सर्व अधिकारी नवीन ठिकाणी पाठविली जातील अशी अपेक्षा होती. परंतू शहाजी उमाप यांच्या आगमनानंतर सुध्दा अद्याप काही घडलेले नाही. परभणी येथील लोखंडी पुरूष तर अत्यंत जोरदारपणे मांडतो की, मला पोलीस महासंचालकांनी एक वर्षाची स्थगिती दिली आहे. नांदेड येथील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक अनेकवेळा मुंबईला जाऊन आले. परंतू त्यांचे अद्याप कोणतेही आदेश आलेले नाही. दुसरे सहाय्यक पोलीस निरिक्षक मी जाणार नाही, कोण मला पाठवतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत आहेत. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना सुध्दा तेथेच ठाण मांडलेले डॉक्टर हे आजही तेथेच आहेत. काय असेल या सवार्र्ंमागचे गमक हे शोधण्यासाठी एखाद्या पीएचडी धारकाला हे काम सोपवावे लागेल.