नांदेड(प्रतिनिधी)-रेतीचा कारभार 95 टक्के बंद असला तरी भविष्यात आशा लक्षात ठेवून त्या कारभाराला योग्य रितीने चालविण्यासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन व्यक्ती नदी पलिकडे असतांना त्या भागातील रेतीची वसुली करत होता आता जिल्ह्याची वसुली करण्याचे प्रशिक्षण जुन्या तज्ञाकडून घेत आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळूचा कारभार एवढ्या मोठा आहे की, नांदेड जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील बऱ्याच वाळू माफियांचा पोट पाण्याचा प्रश्न या वाळूवरच आधारीत आहे. काम आणि ते सुध्दा अवैध असे ज्यावेळेस असते त्यावेळेस पोलीस हा विभाग महत्वपुर्ण असतो. सांगतांना, बोलतांना, व्यक्त करतांना पोलीस सांगतात वाळूशी आमचा काही संबंध नसतो. कारण वाळूवरचे नियंत्रण महसुल खात्याकडे असते. याचा प्रत्यय एकदा बिलोली येथे आला. बिलोली येथे सहाय्यक पोलीस अधिक्षकाने पकडलेल्या अवैध वाळुच्या अनेक गाड्या बिलोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्याने नाममात्र दंड लावून सोडून दिल्या होत्या. हे खरे असले तरी त्यावेळेसचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पहिलाच उपविभाग करत होते. म्हणजेच नवीन होते आणि म्हणून त्यांना पोलीस खाते करील ते होईल या म्हणीबद्दल माहिती नसेल. नाही तर अनेक अधिकारी, पोलीस अंमलदार असे आहेत की, जे पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानंतर सुध्दा त्यांचे ऐकत नाहीत. पोलीस अधिक्षक सुध्दा त्यांचे काही एक करत नाहीत. चालत असते प्रत्येकाचा वेळ असतो आणि वेळ हा बदलत असतो. संपत्ती भरपूर आहे म्हणजे जीवन सुखी आहे असे नसते. त्यासाठी समाधानाची गरज आहे.असो.
नांदेड जिल्हा पोलीस दलात स्थानिक गुन्हा शाखेतील एक महान व्यक्तीमत्व वाळूच्या व्यवसायातील वसुली करण्यात एवढे तज्ञ झाले की, पोलीस अधिक्षकांनी त्याची बदली करतांना फक्त भिंत बदलली. तसेच स्थानिक गुन्हा शाखेतून त्यांना कार्यमुक्त केल्याच्या नोंदी केल्या परंतू कामे मात्र त्याच व्यक्ती करत आहेत. त्यांना सोडल्याची नोंद आणि त्यांनी केलेल्या कामांच्या तारखा तपासल्या तर ती पुन्हा फसवे गिरीच आहे. असो चालत असते म्हणतात ना पोलीस खाते करील ते होईल.
आता वाळु वसुली तज्ञाची बदली झाल्यामुळे त्याच्या जागी त्याचा सारखा सक्षम उमेदवार उभा करणे आवश्यक असते. त्यासाठी आटापिटा करून नदी पलिकडून अगोदर शिवाजीनगर आणि नंतर स्थानिक गुन्हा शाखेत आलेल्या एका महाभागाला जुन्या तज्ञ व्यक्तीकडून रेतीचा कारभार शिकून घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. कुस्ती या खेळातील वस्ताद हा आपल्या चेल्यांना एक डाव शिकवत नाही असे म्हणतात. तेंव्हा रेतीमधील जुना तज्ञ या नवीन व्यक्तीला सर्व काही शिकविल काय? हा ही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. आज 95 टक्के रेतीचा कारभार बंद असला तरी 5 टक्के रेतीचा कारभार सुरुच आहे. पोलीसांनी काही गाड्या सुध्दा पकडल्या आहेत तरी सुध्दा कारभार सुरूच आहे.
नवीन रेती कारभार समजण्यासाठी आलेला महाभाग हा लोखंडी पुरूषासाठी हे काम करत होता. परंतू त्यावेळेस ते काम काही क्षेत्रापुरतेच मर्यादीत होते. आता त्याच्यावर आलेली जबाबदारी मोठी झाली आहे. आता त्याला जिल्ह्याची जबाबदारी सांभाळायची आहे आणि ती सुध्दा आपल्याला छत्रछाया देणाऱ्यांसोबत धोका न करता. धोका देण्यामध्ये जुना तज्ञ किती सक्षम होता तसाच नवीन सक्षम झाला तर पुन्हा एक नवीन अवघड परिस्थिती तयार होणार आहे. या सर्व प्रकारात सर्वसामान्य व्यक्तीला 3500 रुपायांमध्ये मिळणारी वाळूची गाडी आता 10 हजार रुपयांना मिळत आहे. वाळुच्या कारभारातील नदी पात्रातून वाळु काढणारी कामगार मंडळी थोड्या प्रमाणात का होईना वाळू काढतच आहेत. 95 टक्के कारभार बंद असला तरी 5 टक्के वाळू पुरवली जात आहे. मग नुकसान कोणाचे झाले तर ते सर्व सामान्य माणसाचे झाले. ज्याला वाळू स्वस्तात मिळत होती त्याला आता महाग वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यातही ज्याने आपले पोट कापून आपले घर बांधण्याचे स्वप्न पाहिले त्याची सर्वात मोठी अडचण झाली आहे.