नांदेड शहरात रस्त्याने फिरतेवेळी धूळ, दुर्गंध आणी प्रत्येक गाड्यांच्या हॉर्नचा मंत्रमुग्ध आवाज कानावर पडत होत, तेंव्हा वाटायचे याच शहरात आपली जडणघडण झाली आज हेच नकोसे वाटतंय, जिथे बालपण गेले त्या पोलीस वसाहतीत देखील जाऊन आठवणींना उजाळा द्यावा.
शाळा कॉलेज मधील शिक्षक व मित्र कुठे राहतोस विचारायचे तेंव्हा पोलीस कॉलनीत म्हंटल कि थोडं वेगळ्या नजरेने पहायचे व हा काही शिकणार नाही या भावनेने वागणूक द्यायचे ते दिवस आजही आठवतात.
सर्वच पोलीस वाल्यांची मुले काही वाया जात नाहीत हे कधीकधी पोलीस वाल्यांच्या मुलांनी एकत्र येऊन समाजाला सांगायला हवे असे देखील वाटत असते, पोलीसची नोकरी म्हणजे 24 तास सज्ज मानसिक ताणतणावमुळे तसेच अपुऱ्या झोपीमुळे कुटुंबा पासून नकळत दुरावलेल्या पोलिसाच्या मनस्थितीचा अभ्यास करण्यासाठी PHD साठी प्रबंध ठेवायला हवेत जेणेकरून पोलीस रिफॉर्म्स होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.
आम्ही रहायला होतो त्यावेळी नांदेड पोलीस कॉलनीत वाचनालय, सरकारी दवाखाना, पोलीस पतपेढी, गॅस एजन्सी होती.
नांदेड पोलीस कॉलनी हि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस वसाहती पेक्षा मोठी व निराळी होती सर्व पदाधिकारी त्यांच्या पदा प्रमाणे वेगवेगळ्या इमारतीत रहायला होते.
पूर्वी पोलीस कॉलनी खूप स्वच्छ होती, पोलीस अधीक्षक लक्ष्मीनारायण साहेब होते त्यावेळी ते 2-3 महिन्यात स्वतः येऊन स्वच्छेतेची पहाणी करायचे आणि पोलीस कॉलनीतील नागरिक देखील परिसर स्वछ ठेवायचे.
नवीन इमारती झाल्या, मोठे रस्ते झाले रस्ते म्हणजे क्रिकेटची पिचच जणू बॉल बॅटवर बसला कि ताड्कन काचा फुटल्याचा देखील अनेकवेळा आवाज यायचा आणि इमारती पुढील नाल्या म्हणजे बैठकींचा कट्टा असायचा.
घर म्हणजे एक छोटा हॉल, बेडरूम व किचन आता जवळ जाऊन पाहिलं तर वाटतं एवढ्या छोट्या जागेत किती मोठे विश्व होते आता 1400 square feet चे घर देखील छोटे वाटते.
या वसाहतीत जडण घडण झालेली अनेक पोलीसवाल्यांची मुले विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदावर तसेच परदेशात देखील आहेत हे सर्व नमूद करण्याचे मूळ कारण म्हणजे वसाहतीची होत असलेली पडझड थांबवणे हे होय जेणेकरून भविष्यात देखील या वसाहतीतून अनेक तरुण घडतील.
या परिस्थितीस शासकीय उच्च पदस्थ पोलीस अधिकारी, PWD अधिकारी जबाबदार आहेत कि पोलीस कर्मचारी हा विषय महत्वाचा नाहीतर हि परिस्थिती लवकरच बदलली पाहिजे यासाठी सर्वानी विचार करायला हवा असे मला वाटते .
पूर्वी पोलीस कॉलनीत पाणी सोडणारे व्यंकट मामा तिथे भेटले त्यांना विचारले मामा अशी का परिस्थिती झाली हो, तर म्हणाले पूर्वी सारखे प्रामाणिक लोक नाही राहिले, सरकार भी घर बांदायला पैसे देतेय, नवीन भरती झालेल्या पोलीस वाल्याकडे पण मोठं मोठ्या गाड्या आहेत, मोठं मोठी बंगले प्लॉट घेऊन बांधून राहतायत इकडे कोण लक्ष देणार, माझे पैसे सरकार कडे कित्येक वर्ष अडकलेत कोणताही साहेब मदत करत नाही आता या नंतर या म्हणतात सुरेश माझं पोरग माझ्या जागी पाणी सोडतंय हे सांगताना त्यांची डोळे पाणावलेली पाहून न कळत माझ्या पण डोळ्यात धूळ गेलेल्या डोळ्यांनी कचकच करण्यास सुरवात केली.
खरंच नागरिकांनी जागरूक असणं लोकशाहीत किती आवश्यक आहे हे नांदेडची पोलीस वसाहत व नांदेड शहराचे छोटे तसेच धुळमय, रस्ते पाहून वाटते ज्या नांदेड शहराने देशाला सरंक्षण मंत्री , मुख्यमंत्री दिले त्या शहराची हि परिस्थिती तर इतर जिल्ह्यांची काय असेल !
-ऍड. गजानन ढगे.