नांदेड(प्रतिनिधी)–– “एक पेड मां के नाम” वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या अभियान अंतर्गत मंगळवार 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या https://merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच गुगल शीटमध्ये वृक्ष लागवडीची परिपूर्ण माहिती भरावी, असे नागपूरचे रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणचे आयुक्त अय गुल्हाने यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत भारतात पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तनाशी सामना करण्यासाठी आवाहन केले आहे. या मोहीमेंतर्गत 80 कोटी झाडे सप्टेंबर 2024 पर्यंत व 140 कोटी झाडे मार्च 2025 पर्यंत लागवड करण्याची मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याकरीता सप्टेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 57 लाख उद्दीष्टे पुर्ण करण्यात येणार असून मार्च 2025 अखेर पर्यंत 4 कोटी 30 लक्षचे उद्दीष्टे पूर्ण करावयाचे आहे, असेही म्हटले आहे.