नांदेड(प्रतिनिधी)-उपअभियंत्यानेच जलजीवन मिशन कार्यक्रमाचे 7 लाख रुपये स्वत:साठीच वापरून केलेला एक अपहार उघडकीस आला आहे.
कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड येथील अमोल शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 मार्च 2021 ते 31 एप्रिल 2024 दरम्यान किनवट येथील उपअभियंता किशोर मलय्या संद्री यांना जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणी टंचाईवर खर्च करण्यासाठी 7 लाख रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली होती. परंतू त्याचे समायोजन केले नाही. वेळोवेळी त्यांना लेखी पत्र देवून देखील त्यांनी उत्तर दिले नाही. अशाप्रकारे किनवटचे उपअभियंता किशोर मलय्या संद्री यांनी शासनातर्फे योजनेवर खर्च करण्यासाठी दिलेले 7 लाख रुपये मुदतीत खर्च करून त्याचे समायोजन सादर न करता शासकीय पैशांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला आहे.वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 409 नुसार गुन्हा क्रमांक 451/2024 दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक किरवले यांच्याकडे देण्यात आला आहे.
पत्रकारंनी घेतलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचे काय?
जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशनच्या योजनेतील अनेक कामे काही पत्रकारांना खिरापतीसारखी वाटण्यात आली होती. ती कामे कोणाच्या नावाने देण्यात आली होती, कोण त्याचा पाठपुरावा केला, पत्रकारांना काम देण्यात कोणाचा जास्त मोठा हेतु होता असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. पत्रकारांनी दिलेले काम योग्य केले काय?, ज्यांनी पैसे अग्रीम घेतले होते त्यांनी ते योग्य वेळेत समायोजित केले काय? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. उपअभियंत्याने 7 लाखाचा अपहार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. मग पत्रकारांनी केलेल्या जलजीवन मिशन कामाची अवस्था आज काय आहे की, जिल्हा परिषदेने ती कामे थातुर-मातुर पध्दतीने पुर्ण झाल्याची दाखवली याबद्दल खरे देवच जाणेल.