कंधार(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला कंधारचे जिल्हा न्यायाधीश यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.3 सप्टेंबर 2019 रोजी एक अल्पवयीन बालिका माळाकोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुनिल बालाजी सुवर्णकार(24) यांच्या घरी टी.व्ही.पाहण्यासाठी गेली असतांना सुनिल सुवर्णकारने त्या बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर याबाबत पोलीस ठाणे माळाकोळी येथे तक्रार देण्यात आली तेंव्हा माळाकोळी पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 377 आणि पोक्सो कायदा कलम 4, 6 आणि 18 नुसार गुन्हा क्रमांक 128/2019 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात हा विशेष पोक्सो सत्र खटला क्रमांक 21/2019 प्रमाणे सुरू झाला. ज्यामध्ये 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. न्यायालयासमक्ष आलेल्या पुरव्यांच्या आधारावर न्यायालयाने सुनिल बालाजी सुवर्णकार यास 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.शैलजा पाटील यांनी मांडली.माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार दिपक शेळके आणि सुभाष सुर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.