नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या महाविद्यालयानंतर घरी जाणाऱ्या 20 वर्षीय युवतीला बळजबरी पळून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऍटो चालकाला विरोध करत युवतीने भरधाव वेगातील ऍटोतून बाहेर उडी मारली, ती जखमी झाली, जनतेने पकडल्यानंतर
त्या युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आज मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या ऍटो चालकाला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
एका 20 वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती नांदेडमध्ये विद्यार्जन करण्यासाठी येते आणि दुपारी 3.30 वाजता रेल्वे स्थानकाजवळून एस.टी.ने आपल्यागावाकडे जात असते. 5 नोव्हेंबर रोजी 4 वाजता ती रेल्वे स्टेशनपर्यंत आली तेंव्हा तिच्या गावाकडे जाणारी एस.टी.निघून गेली होती. तेंव्हा एक ऍटोवाला तिला म्हणाला कुठे जायचे आहे. युवतीने त्तर दिले की, भोकरफाट्याकडे. ऍटोवाला म्हणाला हिंगोली गेटजवळ बसेस थांबतात मी तेथे सोडतो. रस्त्यात ऍटोवाल्याने सांगितले की मी तुला भोकरफाट्यापर्यंत नेऊन सोडतो, पैशाचे काही टेन्शन घेवू नका असे म्हणत ऍटोची स्पीड वाढवली. तेंव्हा मी ऍटो क्रमांक एम.एच.20 बी.डी.3829 मधून खाली उडी मारली आणि ऍटोचा फोटो काढला. त्यावेळी मला मार लागला, माझा मोबाईल फुटला. तेथे लोक जमा झाले. माझा मोबाईल दुरुस्त करून देण्यासाठी सांगितले असता जमलेल्या लोकांमधील मोरे काकासोबत मी ऍटोमध्ये बसून चिखलवाडी येथे आले. मला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऍटो रिक्षा वाल्याचे नाव शेख नजीर शेख इसाक असल्याचे समजले. त्याविरुध्द कार्यवाही व्हावी.
वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीवरुन शेख नजीर शेख इसाक विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) आणि 62 प्रमाणे गुन्हा क्रमांक 442/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा प्रस्तावित आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वशिष्ट बिक्कड हे करत आहेत. आज पोलीसांनी शेख नजीरला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.