नांदेड(प्रतिनिधि)-शहरातील प्रभाग क्रं.18 देगाव चाळ, पंचशिलनगर, खडकपुरा, भिम घाट, गंगाचाळ यासह शहरातील अनेक भागात पाण्याचे डबके साचून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढले आहेत. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नांदेड शहरात धूर फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांनी केली आहे.
पावसाळा सुरू असल्याने अनेक भागामध्ये पाण्याचे डबके साचले आहे. महापालिकेकडून शहरात नाले सफाई मोहिम राबविली असली तरी बर्याच भागामध्ये नाल्या तुंबून रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. घाण पाण्याचे अनेक ठिकाणी डबके साचले आहेत. या घाण पाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून अनेक जण डेंग्यू, मलेरिया अशा आजाराने त्रस्त असल्याचे चित्र रूग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सकल भागात पाणी साचले आहे त्या ठिकाणी धुर फवारणी करावी. शिवाय वेगवेगळ्या प्रभागातही महापालिकेने धुर फवारणी करावी अशी मागणी बंटी लांडगे यांनी केली आहे.