नांदेड :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहीत कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
क्षेत्रीय स्तरावरुन (Real Time crop data) पीक पाहणी रियल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा/ माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपचालू करुन ात पीक पाहणी ोंदवण्याची नवीन पध्दत शासनाने सुरु केली आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध पिकाची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024 साठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी 3.0.2 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करून घ्यावे. तसेच ई-पिक पाहणी नोंदणीसाठी काही अडचण आल्यास ई पीक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्षाच्या 020 25712712 क्रमांकावर किंवा आपल्या गावचे तलाठी, कृषी सहाय्यक संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे