नांदेड(प्रतिनिधी)-बापूनगर देगलूर येथे एका घराला तोडून चोरट्यांनी 4 लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर शहरातून दुचाकीत ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये चोरट्यांनी लांबले आहेत. हदगाव येथे एका घरातून चोरट्यांनी 61 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. आमदरी ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 60 हजार रुपयांचा ऐवज लांबला आहे.
चंद्रकांत गंगाधर गजलकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बापूनगर देगलूर येथे त्यांचे घर आहे. 28 जुलैच्या सकाळी 6.30 ते 29 जुलैच्या सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांचा घराचा कडीकोंडा कापून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला अणि कपाटाचे दार उघडून त्यातून 4 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे 21 हजार रुपयांचे असा एकूण 4 लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.देगलूर पोलीसांनी हा घटनाक्रम 359/2024 नुसार दाखल केला असून पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
बसवंत हनमंतराव देशमुख हे राज्य परिवहन महामंडळात नोकरीला आहेत. दि.30 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास त्यांनी एसबीआय शाख मंढा देगलूर येथन आपल्या खात्यातून 1 लाख 50 हजार रुपये सोने खरेदी करण्यासाठी काढले. ही रक्कम दुचाकीच्यावर लावलेल्या बॅगमध्ये ठेवून त्याला चैन लावले. रस्त्यात झेरॉक्स मशीनवर थांबले आणि तेथून झेरॉक्स घेवून परत आले तोपर्यंत चोरट्यांनी त्यांचे 1 लाख 50 हजार रुपये गायब केले होते. देगलूर पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 358/2024 नुसार दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मरगेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
आमदरी ता.भोकर येथे राहणारे कालीदास नागोराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलैच्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी स्टीलच्या टाकीमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे 60 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 259/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार हनवते यांच्याकडे देण्यात आला आहे.
हदगाव येथील पत्रकार बाळासाहेब नागोराव पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलैच्या दुपारी 3 ते 30 जुलैच्या सकाळी 9 वाजेदरम्यान महाविर चौक हदगाव येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख 46 हजार रुपये आणि सोन्याचे मंगळसुत्र व चांदीच्या वाट्या असा 15 हजार रुपयांचा ऐवज मिळून 61 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 219/2024 प्रमाणे दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार पांढरे यांच्याकडे दिला आहे.