नांदेड (प्रतिनिधी)-गोदाकाठी वसलेला नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणार्या नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली.
जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ल्यास आ. मोहनराव हंबर्डे यांनी भेट देवून पाहणी केली.त्यांच्यावतीने किल्ला परिसरात दगडी चुरी टाकण्याचेही काम सुरु करण्यात आले.ते म्हणाले, हा किल्ला म्हणजे नांदेड जिल्ह्याची शान असून किल्ल्याला ऐतिहासीक वारसा आहे.गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याचे उत्तम संवर्धन आणि डागडुजी केल्यास देश -विदेशातील पर्यटकांसाठी नंदगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरणार आहे. हा केवळ किल्ला नसून नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी नंदगिरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेणारे नंदगिरी किल्ल्याचे युवा शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते. त्या सर्व युवा वर्गाचे त्यांनी अभिनंदन केले. नांदेड शहराची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी हे सर्व युवा गेल्या अनेक दिवसांपासून घेत असलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.