नांदेड(प्रतिनिधी)-पेवा ता.हदगाव येथील पोलीस पाटलाने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी हदगावचे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरिक्षक पाठविण्यात आले आहेत.
दि.22 जुलै रोजी हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलीस पाटील बाळासाहेब जाधव (50) यांनी ग्राम पंचायत कार्यालयात दौरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यापुर्वी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ बनवला आणि हदगावचे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर हे अत्यंत त्रास देत असल्याचा उल्लेख करून त्या कारणासाठीच मी आत्महत्या करीत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यांचे प्रेत सापडल्यानंतर त्यांचे पुत्र अनिकेत बाळासाहेब जाधव यांनी पोलीस ठाणे हदगाव येथे तक्रार दिली की, माझे वडील पेवा गावचे पोलीस पाटील या पदावर मागील 20 वर्षापासून काम करीत आहेत. मागील आठवड्यापासून ते तणावात असल्याचे पाहुन मी आणि माझ्या आईने त्यांना याबाबत विचारणा केली असता हदगावचे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांनी हे मला मानसिक त्रास देत आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितले होते.
22 जुलै रोजी बाळासाहेब जाधव हे माझ्या आईला हदगाव पोलीस ठाणत ाऊन येतो असे म्हणून सकाळी 9 वाजता घरातून निघाले. त्यानंतर 11 वाजेच्यासुमारास माझ्या आईला माहिती मिळाली की, वडील बाळासाहेब जाधव यांनी ग्राम पंचायत कार्यालयात फाशी घेतली आहे. गावातील नागरीक व ग्राम पंचायत कार्यालय येथील लोकांनी त्यांना खाली उतरवून खाजगी वाहनाने दवाखान्यात नेले पण त्यांचा मृत्यू झालेला होता. सरकारी दवाखाना येथे माझ्या नातलगांनी वडील बाळासाहेब जाधव यांचा मोबाईल तपासला असता त्यात एक व्हिडीओ चित्रफित होती. त्या चित्रफितीमध्ये मी पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे असे म्हटलेले आहे. माझ्या वडीलांचा मोबाईल मी आपल्या समक्ष हजर करत आहे. या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार गुन्हा क्रमांक 213/2024 दाखल केला आहे. हा गुन्हा 23 जुलै रोजी रात्री 1.28 वाजता दाखल झाला आहे. हदगाव येथे नवीन पोलीस निरिक्षक पाठविण्यात आले आहेत.