मारेकऱ्याची ओळख पटवा 50 हजाराचे बक्षीस मिळवा

नांदेड(प्रतिनिधी)- जून महिन्यात 20-25 वर्षीय महिलेचा जाळलेला मृतदेह माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळच्या नखेगाव शिवारात सापडला. या घटनेच्या संदर्भाने माहूर पोलीसांनी एक सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करून त्यातील दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर ती माहिती पोलीसांनाा द्यावी. माहिती देणाऱ्याला पोलीस विभाग 50 हजार रुपये रोख बक्षीस देईल आणि त्याचे नाव गुप्त सुध्दा ठेवले जाईल असे एका प्रसिध्द पत्रकाद्वारे पाठविले आहे.
6 जून रोजी नखेगाव शिवारात एका महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले. प्रसार माध्यमानी आप-आपल्या परिने त्या घटनेचे विवेचन करून त्या बातम्यांना प्रसारीत केले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली आणि ती मरण पावणारी महिला गर्भवती होती हे सिध्द झाले. तसेच त्या महिलेला गळादाबून मारून तिचे प्रेत जाळण्यात आले होते अशी माहिती वैद्यकीय अहवालात समोर आली. तेंव्हा पोलीसांनी या घटनेच्या संदर्भात भारतीय दंड संहितेनुसार खून करणे, पुरावा नष्ट करणे अशा सदरांखाली गुन्हा क्रमांक 65/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास माहूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्याकडे देण्यात आला.
घडलेला प्रकार हा दुर्देवी तर आहेच पण त्याची गंभीरता ऐवढी आहे की, मारेकऱ्याने बाईचा तर खून केलाच पण तिच्या पोटातील बाळाचा पण खून केला. त्यामुळे सर्व नांदेड जिल्हा पोलीस दल त्यांची वेगवेगळी पथके नांदेड, यवतमाळ, आदीलाबाद, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये स्वत: फिरले. अशा वर्णनाची महिला कोठे गायब आहे काय? याचा शोध घेतला. पण मारेकऱ्याच्या सुदैवाने नांदेड पोलीसांच्या तपासाला यश आले नाही. तरी पोलीस थकले नव्हते. त्यांनी कोणत्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये संशयीत एक पुरूष एक महिला जात आहेत याचा शोध घेण्यास सुरूवात केली. किनवट -माहूर रस्त्यावरील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका दुचाकी गाडीवर एक दाढी असणारा पुरूष गळ्यात पांढरी दस्ती, निळा शर्ट आणि क्रिम रंगाची पॅन्ट आणि स्पोर्टस शुज परिधान केलेला आहे आणि त्याच्या मागे बसलेली महिला साडी परिधान केलेली आहे तसेच तिने आपले तोंड बांधलेले आहे. या चित्रावर पोलीसांना संशय आला. गाडी चालविणाऱ्याच्या तोंडाला काही बांधलेले नाही आणि 5 जून रोजी तर जिल्ह्यात सूर्य आग ओकत होता. याचा अर्थ हा गाडी चालवणारा व्यक्ती जवळपासचाच आहे. काही अंतरावर जायचे आहे म्हणूनच त्याने आपले तोंड बांधलेले नसावेत. माहूर पोलीसांनी हे छायाचित्र जारी करून एक जाहीर आवाहन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार चित्र थोडे अंधूक असले तरी या व्यक्तीला रोज पाहणारा व्यक्ती अंधूकतेत सुध्दा त्याला ओळखू शकतो. म्हणून पोलीसांनी आवाहन केले आहे की, या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी या संदर्भाची माहिती पोलीस ठाणे किनवट येथे द्यावी. जेणे करून गरोदर महिलेच्या मारेकऱ्याला गजाआड करता येईल. माहिती देण्यासाठी पोलीसांनी माहूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे(मो.9923178909), सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल गायकवाड(मो.9657331100), पोलीस उपनिरिक्षक पालसिंग ब्राम्हण(मो.9921235344), पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे (मो.9527961335) अशी संपर्काची साधणे दिली आहेत. सोबतच माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपये रोख बक्षीस आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल अशी हमी दिली आहे.
या घटनेच्या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा आपल्या वाचकांना अत्यंत नम्र विनंती करत आहे की, एका गरोदर महिलेला मारण्यासाठी या व्यक्तीवर पोलीसांना संशय आहे आणि तुम्ही जर दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला ओळखत असाल तर नक्कीच या संदर्भाची माहिती पोलीस विभागाला द्या अशा मारेकऱ्यांना काही त्रुटींमुळे खून करून मोकळे राहण्याची संधी मिळत असेल ती समाजासाठी घातक आहे. नागरीकांनी या संदर्भाची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडराय धरणे यांना द्यावी अशी नम्र विनंती आम्ही वाचकांना करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!