नांदेड(प्रतिनिधी)-विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी शासनाच्या से नंतर न्यायालयासमक्ष नांगी टाकली आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे लाडके पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गातील अडथळा दुर होण्याची तयारी सुरू झाली आहे.
9 जुलै रोजी शासनाच्या गृहविभागाने एका आदेशानुसार काही भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या होत्या. त्या आदेशानुसार नांदेडचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविले होते आणि त्यांच्या जागी पोलीस उपमहानिरिक्षकाची पदोन्नती प्राप्त शहाजी उमाप यांना नियुक्ती दिली होती. अनेकांनी त्या संदर्भाच्या बातम्या लिहितांना अत्यंत विद्वतापुर्ण काही वाक्य व्हॉटसऍपवर प्रसारीत केली. पण बातम्या कोणी लिहिल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रभागेच्या तिरे श्वानाच्या मागे पळणाऱ्या संत ज्ञानदेवांची आठवण झाली.
या आदेशाला डॉ.शशिकांत महावरकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण येथे मुळ अर्ज क्रमांक 707/2024 नुसार आवाहन दिले. सुरूवातीच्या प्रथम सुनावणीमध्येच डॉ.शशिकांत महावरकर यांना कॅट न्यायालयाने स्थगिती दिली ज्यानुसार शहाजी उमाप यांना नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाचा प्रभार घेता आला नसता. म्हणून नांदेडला आलेल्या शहाजी उमाप यांना परत जावे लागले होते. त्याप्रकरणाची पुढील सुनावणी 19 जुलै रोजी होती. गृहविभागाने या संदर्भाचा से न्यायालयात सादर करतांना न्यायालयास विनंती केली की, एका बदलीला स्थगिती दिली तर प्रशासनाच्या संपुर्ण कारभारावरच अनेक प्रश्न उभे राहतील, प्रशासन चालवितांना त्रास होईल. तेंव्हा आमच्या आदेशाला दिलेली स्थगिती रद्द करून न्याय द्यावा. आपल्या से मध्ये शासन म्हणत आहे की आमच्याकडे काही जागा रिक्त आहेत. तेथे आम्हाला नियुक्त्या द्यायच्या आहेत. तेंव्हा डॉ.शशिकांत महावरकर यांना आमच्याकडे उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांमध्ये जी नियुक्ती हवी असेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. न्यायालयात शासनाने सादर केलेल्या जागांमध्ये एक जागा पोलीस सहआयुक्त पिंपरीचिंचवड ही रिकामीच होती. शशिकांत महावरकर यांनी त्या जागेवर आपले बोट ठेवून शासनासमोर नांगी टाकली. विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग या मानाने सह पोलीस आयुक्त पिंपरीचिंवड ही जागा डॉ.शशिकांत महावरकर यांना आवडणारीच होती. म्हणून त्यांनी न्यायालयात ही बाब मान्य केली. शशिकांत महावरकरच नव्हे तर त्यांच्या पदातील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ही नियुक्ती आवडण्यासारखीच आहे. कॅट न्यायालयाने हे सर्व सादरीकरण ऐकून घेतले आहे आणि निकालासाठी 29 जुलै ही तारीख ठरवली आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आम्ही लिहिल्या बातमीवर शिक्का मोर्तब होईल आणि त्यानंतर शहाजी उमाप नांदेडला येणाऱ्या मार्गात अडथळा शिल्लक राहणार नाही. आज झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर नांदेड जिल्ह्यात अनेक जण आपल्या गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. आता कोणाच्या गुडघ्याची बाशिंगी शहाजी उमापच्या चाचणीमध्ये खरी उतरता हे येणारा काळ दाखवेल.