नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय लोकशाहीतल्या चौथ्या आधार स्तंभाला शासन आणि जनता यांच्यातील दुवा असे म्हणतात. पुढे-पुढे या चौथ्या आधारस्तंभाचे स्त्रोत वाढत गेले. त्यात अगोदर वृत्तवाहिन्या आल्या. त्यानंतर युट्युब चॅनल आले. फेसबुक, व्हाटसऍप, ट्विटर, पोर्टल, इंस्टाग्राम अशा अनेक स्त्रोतांमुळे प्रसार माध्यमांचे वर्तुळ वाढले. यात चांगले काम करणारे आणि वाईट काम करणारे या दोघांचाही समावेश आहे. काही व्हाटसऍपगु्रप विशेष अधिकाऱ्यांच्या हुजूरेगिरीसाठी चालविले जातात. स्वत:ला क्राईम गोगो म्हणवणारे असे सांगतात की, गुन्हा दाखल होण्या अगोदरच मला माहित असतो.पण या वाक्याची सत्यता कोणीच पडताळून पाहिली नाही आणि व्हाटसऍप गु्रप चाललेल्या चर्चांना अधिकारी भुलतात, विशेष करून पोलीस अधिकारी भुलतात आणि त्यांच्या आहारी जातात.
लोकशाहीमध्ये चौथ्या आधारस्तंभाला प्रसार माध्यमाला मोठे महत्व आहे. पण आज त्या महत्वाची पुर्णपणे वाट लागलेली आहे. आज काही वृत्तवाहिन्या ज्या पध्दतीने एकाच माणसाची गात आहेत. त्यामुळे वृत्तवाहिन्यावरील दर्शकाचा विश्र्वास उडून चालला आहे. यासोबत काही नेत्यांनी युट्युब चॅनल स्वत:चे बनवले आणि त्यांचीच माणसे छायाचित्रीकरण करतात आणि त्याचे प्रसारण करतात. पण या बातम्यांना किती लोक पाहतात. याचे काही गणित माहित नाही. पण काही पत्रकार असे आहेत की, ज्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर आपले विश्लेषण प्रसारीत केले तर त्यांचे विश्लेषण तासभरात 1 लाख पेक्षा जास्त लोक पाहतात. त्यांची एकूण संख्या किती होत असेल. असो या जगात नाण्याला दोन बाजू आहेत. हे सत्यच आहे.
आपल्या भाकरीवर तुप ओढण्याची प्रथा ही काही आज अस्तित्वात आली नाही. ती पुर्वापार पासून सुरू आहे. पण तुप किती हवे असते आणि किती आपल्याला पचते याला खुप महत्व आहे. जर ते आपल्याला पचतच नसेल तर आपल्या भाकरीवर ओढून आपल्याला काय फायदा. एकदा संत ज्ञानेश्र्वर चंद्रभागेच्या तिरी आपल्यासाठी आणि आपल्या भावंडासाठी भाकरी तयार करत असतांना एक कुत्रा त्यांची एक भाकरी घेवून पळाला. त्यावेळी संत ज्ञानेश्र्वर त्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळाले आणि ओरडत होते अरे थांब बाबा तुझ्या भाकरीला तुप लावून देतो नाही तर तुला ठसका लागेल. या संत ज्ञानेश्र्वरांच्या कृतीला समजण्याइतपत आमची पात्रता नाही. परंतू ज्या संदर्भाने आम्ही हे वाक्य लिहिले आहे त्या संदर्भाने ते अत्यंत बरोबर आहे.
काही ठिकाणी काही व्हाटसऍप गु्रप चालविले जातात. त्या गु्रपमध्ये कोणीही चर्चा करू नका हा क्राईम गु्रप आहे अशा सुचना टाकल्या जातात. पण त्यांच्या चाहत्या लोकांनी काही टाकले तर त्यांच्यावर आक्षेप नसतो. पण इतरांनी कोणी काही टाकले तर त्यावर असे संदेश टाकायचे नाही असे लिहिले जाते. विशेष करून पोलीस अधिकाऱ्यांबद्दल, घडलेल्या घटनांबद्दल काही लिहिले तर अंधार पडल्यानंतर त्या लिहिणाऱ्याला त्या गु्रपमधून डिलिट केले जाते आणि दुसऱ्या दिवशीचा सुर्योदय झाल्यानंतर त्याला परत ऍड केले जाते. अंधारात का काढले जाते याचे गमक सुध्दा लिहिता आले असते परंतू ते लिहुन आम्ही आमची पातळी खाली आणू इच्छीत नाही.
पत्रकार, प्रसार माध्यमे यांनी समाजात दबलेला आवाज जनतेसमोर आणायचा असतो आणि प्रशासनाने त्यावर कारयवाही करायची असते अशी खरी पध्दत आहे. पण ज्या लोकांना गुन्हा दाखल होण्यापुर्वीच माहित असतो असे ते सांगतात आणि आपला प्रभाव किती आहे हे दाखवतात ते गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा कधी बातमी लिहित नाहीत. व्हाटसऍपवर ज्या चर्चा केल्या जातात त्या संदर्भाची बातमी सुध्दा कधी दिसली नाही.
या सर्व प्रकारातून पोलीस अधिकाऱ्यांबद्दल आम्ही तुमच्या किती चांगल्या बाजूचा विचार करतो असे दाखविण्याचा हा नवीन धंदा या डिलिट आणि ऍडमध्ये सुरू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे आपला कार्यकाळ पुर्ण करणे आणि तो सुध्दा चांगल्या परिस्थितीत पुर्ण करणे एवढीच अपेक्षा असते. त्यासाठी म्हणूनच काय की पोलीस अधिकारी संत ज्ञानेश्र्वरांची भुमिका वठविण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत सध्या सुरू असलेल्या प्रचार माध्यमांच्या आणि त्यातील व्यक्तींच्या उठाठेवींमुळे प्रसार माध्यमांची, समाज माध्यमांची ताकत लयाला जात आहे आणि ही ताकत लयाला गेली तर प्रशासन आणि त्यातील अधिकारी या प्रसार माध्यमांमधील व्यक्तींचे काय हाल करतील हे सांगण्याची गरज नाही.