रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान

नांदेड,(प्रतिनिधी)-एका अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीने स्वत:च आपल्या अवयवदानाची अभिमानास्पद कामगिरी केली. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे सहा लोकांना जिवदान मिळाल्याची माहिती आहे. ग्रीन कॉडीडोअर तयार करून हे अवयव दवाखाना ते विमानतळ 5 मिनिटात पोहचविण्यात आले.
दि.29 जून रोजी सुनिल महादेव बागडे यांनी पोलीस ठाणे माळाकोळी येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा प्रशिल सुनिल बागडे हा महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा माळाकोळी येथे नोकरी करत होता आणि तो लोहा येथे राहत होता. माळाकोळी ते मालेगाव जाणाऱ्या हायवे क्रमांक 361 लांडगेवाडी गावाजळ त्यांच्या कारचा आणि एका ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला. या अपघातात प्रशिल बागडे यांचा मृत्यू जागीच झाला आणि त्यांचे इतर तिन सहकारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 138/2024 नुसार या अपघाताला कायदेशीर स्वरुप दिले. अपघातात जखमी झालेले अभिजित अशोक ढोके, आशिष तुकाराम धुमनखेडे व शादुल उमदुसाब शेख हे जखमी झाले होते. त्यांची कार क्रमांक एम.एच.24 एएफ 6617 चे भरपूर नुकसान झाले होते.
या प्रकरणातील जखमी अभिजित ढोके यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना बहुदा अभिजित ढोकेला याची जाणिव झाली की, मी आता जिवंत राहणार नाही म्हणून त्यांनी आपले अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. आज त्यांची प्राणज्योत मावळल्यानंतर त्यांचे ऱ्हदय, यकृत, दोन्ही किडण्या, दोन्ही डोळे आणि दोन्ही फुफूसे गरजवंतांना पाठविण्याची तयारी सुरू झाली. पोलीसांनी खाजगी दवाखाना ते विमानतळ या रस्त्यावर ग्रीन कॉडीडोअर तयार केले आणि त्या माध्यमातून अवयव घेवून जाणारी यंत्रणा 5 मिनिटात विमानतळ येथे पोहचली आणि विमानाने ते अवयव गरजवंतांसाठी पाठविण्यात आले. नांदेडमध्ये अशा अवयवदानाची अशी 6 वी प्रक्रिया आहे. अभिजित ढोके आणि त्यांच्या कुटूंबियांनी घेतलेला निर्णय प्रशंसनिय आहे. त्यांच्यामुळे जवळपास सहा जणांना जिवदान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *