पोलीस महासंचालकांच्यावतीने सेवानिवृत्ती समारंभासाठी मार्गदर्शक तत्वे

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , मंत्रालयीन अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले असून निरोप समारंभ कसा पुर्ण करावा यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचवली आहेत. या परिपत्रकावर पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.निखील गुप्ता यांनी स्वाक्षरी करून ते राज्यभरातील पोलीस घटकांना पाठविले आहे. या निरोप समारंभात पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे एक प्रमाणपत्र सुध्दा सेवानिवृत्त पोलीसांना दिले जाणार आहे.
2 जुलै 2024 रोजी जारी झालेल्या या परिपत्रकानुसार सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ त्या महिन्याच्या कामाजाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी आयोजित करण्यात यावा. सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभासाठी घटकप्रमुखाने स्वत: उपस्थित राहावे. त्या दिवशीचे इतर कार्यक्रम शक्यतो रद्द करावे. सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभात पोलीस घटकाच्या आस्थापना शाखेने निमंत्रीत करावे. सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीने इतर काही नातेवाईक आणि इतरांना बोलावण्याची इच्छा व्यक्त केल्यास शक्य असल्यास त्यांनाही बोलविण्यात यावे. स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या एक वर्षापुर्वीच त्यांचे सेवानिवृत्ती विषयक सर्व कागदपत्रांची कार्यवाही सुरू करावी आणि सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ सेवानिवृत्तीधारकास प्रधान करावा. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी पुरूष असल्यास त्यांच्या पत्नीला सुध्दा 1500 रुपये किंमतीपर्यंतची भेट वस्तु (साडी) देण्यात यावी. सेवानिवृत्त होणारी महिला असेल तर त्यांच्या पतीला सुध्दा 1500 भेट वस्तु (शर्ट पिस) देण्यात यावा. सेवानिवृत्ती धारकास शाल, श्रीफळ, झाडाचे रोपटे तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेले स्मृतीचिन्ह आणि पोलीस महासंचालकाचे पत्र देण्यात यावे. निवृत्तीधारकास त्या घटकातील सर्व दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करावा. सेवानिवृत्ती निरोप समारंभ समाप्तीनंतर उपस्थितांकरीता अल्पोपहार व चहापाण्याची सोय करावी. पोलीस महासंचालकाकडून एक स्मृतीचिन्ह द्यायचे आहे. त्यासाठी ते कोणत्या पुरवठा धारकाकडून मागवावे याचे मोबाईल नंबर व पत्ता परिपत्रकात नमुद केला आहे. हे स्मृतीचिन्ह 900 रुपये किंमतीचे असेल. सोबतच सबंधीत पोलीस घटकाकडून देण्यात येणारे स्मृतीचिन्ह त्या घटकप्रमुखांनी त्यांच्या स्तरावर ठरवून प्रदान करावे. सेवानिवृत्ती समारंभाला येण्यासाठी तसेच घरी परत जाण्यासाठी निवृत्तीधारक व त्यांच्या कुटूंबियांकरीता कार्यालयीन वाहनाची व्यवस्था व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *